पाकिस्तान संघासाठी उपांत्य फेरीत स्थान मिळवणे केवळ आता गणिताचे कोडे आहे. विश्वचषक स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला आज शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवावा लागणार आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमदने शुक्रवारी चमत्कार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी तो बोलत होता.

बांगलादेशविरोधात गेल्या चार सामन्यात पराभवाचा सामना करणारा पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज म्हणाला की, आम्ही येथे प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आलो आहोत. अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न करणार आहोत. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी आम्ही सर्वस्वी पणाला लावू. जर अल्लाहच्या मनात असेल तर चमत्कार होईल. ते असे आहे की ६००, ५००, ४०० धावा करून त्याच मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला ५० धावांत बाद केल्यानंतरच ३१६ धावांच्या फरकाने विजय मिळवता येईल. जर तुम्हाला हे शक्य वाटत असेल तर आम्ही प्रयत्न करायला तयार आहे. असा विश्वास सरफराजने व्यक्त केला.

बांगलादेशविरोधात नाणेफेक जिंकून ५०० धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करू. विडिंजविरोधात आम्ही धावगती वाढवू शकलो नाही. आमचा नेट रनरेट खूप कमी आहे. पण बांगलादेशविरोधात आम्ही ५०० धावा करण्याचा प्रयत्न करू. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी आम्ही सर्वेतपरी प्रयत्न करणार आहोत. जर आमच्या नशीबात चमत्कार लिहला असेल तर शुक्रवारी नक्कीच तो होईल, असे सरफराज म्हणाला.

इंग्लंडने अखेरच्या दोन सामन्यांत भारत आणि न्यूझीलंडला हरवत आपले उपांत्य फेरीचे स्थान निश्चित केले. त्यामुळे पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचे नऊ सामन्यांत ११ गुण झाले आहेत. पाकिस्तान नऊ गुणांनीशी पाचव्या क्रमांकावर असून सरासरीमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला मोठय़ा फरकासह विजय मिळवावा लागणार आहे. मात्र त्यासाठी सरफराज अहमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला आता गणितीय रचनेनुसार प्रथम नाणेफेक जिंकावी लागेल आणि फलंदाजी स्वीकारावी लागेल. प्रथम फलंदाजी करताना ३५० पेक्षा अधिक धावा फटकावल्यास, पाकिस्तानला बांगलादेशवर ३११ धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा ४००पेक्षा अधिक धावा उभारल्यास, त्यांना ३१६ धावांनी विजयाची नोंद करावी लागेल. मात्र बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यास, पाकिस्तानचे आव्हान लगेच संपुष्टात येईल.