दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज पोलॉकची ‘आयसीसी’कडे मागणी

जोहान्सबर्ग : जैवसुरक्षित वातावरणात चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर केल्यास कोणताही धोका उद्भवण्याची शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉकने व्यक्त केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) लाळेचा वापर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही पोलॉकने केली आहे.

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात लवकरच जैवसुरक्षित वातावरणात कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आयसीसी’ने चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करण्यास मनाई केल्याने गोलंदाजांची बिकट अवस्था होणार आहे. मात्र पोलॉकने जैवसुरक्षित वातावरणात चेंडूला लाळ लावल्याने काहीही हानी होणार नाही, असा दावा केला आहे.

‘‘यापुढे कोणतीही क्रिकेट मालिका सुरू करण्यापूर्वी तेथील वातावरणाची तसेच खेळाडूंच्या आरोग्याची अधिक काळजी घेतली जाईल. त्याशिवाय मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी खेळाडूंना १५ दिवस स्वयं अलगीकरण करणे अनिवार्य असेल. प्रेक्षकांचीही स्टेडियममध्ये प्रवेश देण्यापूर्वी चाचणी केली जाईल. त्यामुळे अशा वातावरणात करोनाचा फैलाव होण्याची शक्यता फारच कमी आहे,’’ असे ४६ वर्षीय पोलॉक म्हणाला.

‘‘जर प्रेक्षकांशिवाय सामने खेळवण्यात आले, तर यामधील जोखीम अधिक कमी होईल. पंचांना हातमोजे घालणे बंधनकारक आहे, तर फलंदाज ग्लोव्हस घालूनच चेंडूला स्पर्श करतात. अशा परिस्थितीत गोलंदाजी करणारा संघच शक्यतो चेंडूला स्पर्श करेल, मग त्यांनी चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर का करू नये. त्यामुळे ‘आयसीसी’ने या नियमाविषयी पुन्हा विचार करावा,’’ असेही पोलॉकने सांगितले.