ट्वेन्टी-२० क्रिकेट सध्या सर्वाच्या पसंतीचे झाले असून या प्रकारातील नियमांत कोणत्याही नव्या बदलांची फारशी आवश्यकता नाही. परंतु भविष्यात गोलंदाजांना प्रत्येक षटकात किमान दोन उसळते चेंडू (बाऊन्सर) टाकण्याची परवानगी देण्याचा विचार करावा, अशी सूचना भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केली आहे.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाच महिने क्रिकेट ठप्प पडले होते. परंतु ‘आयपीएल’च्या माध्यमाने भारतीय खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाल्यामुळे ट्वेन्टी-२० प्रकाराकडे त्यांचा कल वाढत आहे, असे गावस्कर यांना वाटते.

‘‘ट्वेन्टी-२० सामन्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून, यामध्ये ‘आयपीएल’चे मोठय़ा प्रमाणावर योगदान आहे. परंतु यामध्ये फलंदाजांचेच वर्चस्व दिसून येते. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने गोलंदाजांनाही समान संधी देण्यासाठी पावले उचलायला हवीत,’’ असे ७१ वर्षीय गावस्कर म्हणाले.

‘‘वेगवान गोलंदाजाला प्रत्येक षटकात किमान दोन उसळते चेंडू टाकण्याची मुभा, सीमारेषेच्या लांबीत वाढ, वैयक्तिक पहिल्या तीन षटकांत बळी मिळवणाऱ्या गोलंदाजाला एकूण पाच षटके गोलंदाजी करण्याचा पर्याय, अशा प्रकारचे काही आकर्षक बदल ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये केले जाऊ शकतात,’’ असेही गावस्कर यांनी सुचवले. त्याचप्रमाणे ‘मंकडिंग’ला पाठिंबा दर्शवताना समोरच्या बाजूचा फलंदाज एकदा ताकीद देऊनही गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच निघत असेल, तर गोलंदाजाने त्याला बाद करून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पाच धावाही कमी कराव्यात, असेही गावस्कर यांनी सुचवले.