विंडीज दौऱ्यात अंबाती रायडूने केलेल्या खेळीमुळे भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीचा प्रश्न आता निकाली लागला आहे. खुद्द कर्णधार विराट कोहलीने याचे संकेत दिले आहेत. विराटने केलेल्या प्रशंसेमुळे आगामी विश्वचषकासाठी रायुडू भारतीय संघात आपलं स्थान कायम राखेल, अशी आशा आता व्यक्त केली जात आहे. मात्र भारतीय संघात आपलं स्थान पक्क करण्यासाठी अंबाती रायुडूने गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड मेहनत घेतली आहे. पाचव्या वन-डे सामन्यात विंडीजवर मात केल्यानंतर अंबाती रायुडूने एका रहस्याचा उलगडा केला आहे.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यात टी-२० संघामध्ये अंबाती रायुडूची निवड करण्यात आली होती. मात्र यो-यो फिटसेन टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे त्याला संघातलं आपलं स्थान गमवावं लागलं. मात्र यानंतर विंडीज दौऱ्यासाठी रायडूने यो-यो फिटनेस टेस्ट पास करत पुन्हा एकदा संघातलं आपलं स्थान निश्चीत केलं. संघात आपलं स्थान पक्कं करण्यासाठी अंबाती रायुडू गेले काही दिवस खाण्याची बरीच पथ्य सांभाळतो आहे. बिर्याणी हा त्याचा विकपॉईंट आहे, मात्र संघात पुनरागमन करण्यासाठी रायुडूने गेले ३ महिने बिर्याणीचा पूर्णपणे त्याग केला आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर मोहम्मद कैफ, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या क्रिकेटपटूंशी बोलत असताना रायुडूने हा उलगडा केला आहे.

३३ वर्षीय अंबाती रायुडू हा मुळचा आंध्रप्रदेशमधील गुंटूरचा रहिवासी आहे. बिर्याणी हे आंध्र प्रदेश व हैदराबाद या परिसरातली लोकांचा आवडता खाद्यपदार्थ मानला जातो. विंडीज दौऱ्यात अंबाती रायुडूने चौथ्या क्रमांकावर समर्थपणे फलंदाजी करत एक शतकंही झळकावलं आहे. याचसोबत प्रसंगानुरूप फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवून देण्यातही रायुडूने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे बिर्याणीचा त्याग हा एका अर्थाने अंबाती रायुडूसाठी फायदेशीर ठरला असं म्हणायला हरकत नाही.