पदकतालिकेत अमेरिका अव्वल; पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर शर्यतीत धक्कादायक निकाल

लंडन येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत अनपेक्षित निकालाचे सत्र अखेरच्या दिवशीही कायम राहिले. पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो संघाने धक्कादायक निकाल नोंदवत अमेरिकेचे विक्रमी सुवर्ण हिसकावले. अमेरिकेने १० सुवर्णसह एकूण ३० पदकांची कमाई करताना अव्वल स्थान कायम राखले. मात्र सलग सातव्यांदा जागतिक स्पर्धेत पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचे अमेरिकेचे स्वप्न धुळीस मिळाले.

पुरुषांच्या रिले प्रकारात अमेरिकेलाच जेतेपदाचे दावेदार मानले जात होते, परंतु जेरीन सोलोमन, जेरीन रिचर्ड्स, मॅचेल सेडेनियो व लॅलोंडे गॉर्डन या त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगोच्या खेळाडूंनी अनपेक्षित कामगिरी केली. २ मिनिटे ५८.१२ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवताना या चौघांनी त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगोला सुवर्णपदक जिंकून दिले. अमेरिका (२:५८.६१ से.) आणि ग्रेट ब्रिटन (२:५९.०० से.) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले प्रकारात अपेक्षित निकाल पाहायला मिळाला. अ‍ॅलिसन फेलिक्स, क्व्ॉनरा हॅयेस, शकिमा विम्बली व फिलिस फ्रान्सिस यांनी अमेरिकेला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले. ३ मिनिटे १९.०२ सेकंदांच्या जागतिक आघाडी वेळेसह अमेरिकेने सुवर्णपदक नावावर केले.

अमेरिकेच्या फेलिक्सने या सुवर्णपदकासह जागतिक स्पध्रेत सर्वाधिक ११ सुवर्ण जिंकणाऱ्या उसेन बोल्टच्या विक्रमाशी बरोबरी केली. जागतिक स्पध्रेत सर्वाधिक १६ पदके फेलिक्सच्या नावावर आहेत आणि हा एक विक्रमच आहे. बोल्टच्या नावावर एकूण १४ पदके आहेत. ग्रेट ब्रिटनने ३ मिनिटे २५ सेकंदांच्या कामगिरीसह रौप्य, तर पोलंडने ३ मिनिटे २५.४१ सेकंदासह कांस्यपदक निश्चित केले.

अन्य निकाल

  • पुरुष : उंच उडी : मुताझ इस्सा बारशिम (कतार) २.३५ मीटर, डॅनिल लिसेंको २.३२ मी., माजो एडीन गझल (सीरिया) २.२९ मी.
  • १५०० मीटर : एलिजाह मोटोनेई मनांगोई (केनिया) ३:३३.६१ सेकंद, टिमोथी चेरुईयोट (केनिया)३:३३.९९ से., फिलिप इंगेब्रिग्टसेन (नॉर्वे) ३:३४.५३ से.
  • महिला : थाळीफेक : सॅण्ड्रा पेर्कोव्हिक (क्रोएशिया) ७०.३१ मीटर, डॅनी स्टीव्हन्स (ऑस्ट्रेलिया) ६९.६४ मीटर, मेलिना रॉबर्ट-मिचॉन (फ्रान्स) ६६.२१ मीटर
  • ५००० मीटर : हॅलेन ओनसांडो ओबिरी (केनिया) १४:३४.८६ से., अनमाझ अयाना (इथोपिया) १४:४०.३५ से., सिफान हसन (नेदरलँड्स) १४:४२.७३
  • ८०० मीटर : कॅस्टर सेमेन्या (दक्षिण आफ्रिका) १:५५.१६ से., फ्रान्सिने नियोंसाबा (बुरुंडी) १:५५.९२ से., अ‍ॅजी विल्सन (अमेरिका) १:५६.६५ से.