एका महिलेला मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या कथित आरोपांप्रकरणी भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू अमित मिश्रा याला मंगळवारी अटक करण्यात आली. तीन तासांच्या कसून चौकशीनंतर मिश्राची जामिनावर सुटका करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे सराव शिबीर बंगळुरू येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या कालावधीदरम्यान मिश्राने मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला. ही महिला मिश्राची मैत्रीण असल्याचेही स्पष्ट झाले होते. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत बंगळुरू पोलिसांनी मिश्राला समन्स बजावले होते. त्यानुसार मिश्राला आठवडाभरात हजर होण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. एकदिवसीय मालिका संपल्यानंतर मिश्रा तत्काळ बंगळुरूला रवाना झाला.
दरम्यान या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर या महिलेने तक्रार मागे घेतल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्षात तिने तक्रार मागे घेतलीच नाही. मिश्राला तीन वर्षांपासून ओळखते आहे. भारतीय संघाचे वास्तव्य असलेल्या हॉटेलच्या खोलीत मिश्राने मारहाण केल्याचे या महिलेने सांगितले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३२३ आणि ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात मिश्राचा समावेश आहे. पहिली कसोटी ५ नोव्हेंबरपासून मोहाली येथे सुरू होणार आहे. जामीन मिळाल्यामुळे मिश्राचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.