भारताच्या ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने विश्वविजेतेपदाला साजेसा खेळ करीत लिवॉन अरोनियन याच्यावर मात केली आणि टाटा स्टील करंडक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली.
आनंदला गेल्या सात महिन्यांमध्ये निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले होते. त्या तुलनेत यंदाच्या वर्षांतील पहिलीच स्पर्धा आतापर्यंत त्याच्यासाठी चांगली ठरली आहे. जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानावर असलेल्या अरोनियनविरुद्ध त्याने अव्वल खेळ केला. काळय़ा मोहऱ्यांसह खेळणाऱ्या आनंदने २३व्या चालीला अरोनियनवर निर्णायक विजय मिळविला. आनंदने जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू मॅग्नस कार्लसन (नॉर्वे) व सर्जी कर्झाकिन (रशिया) यांच्यासह प्रत्येकी तीन गुणांसह आघाडी मिळविली.
कार्लसनने भारताच्या पी. हरिकृष्णवर शानदार विजय मिळविला. कर्झाकिन याने पराभवाच्या छायेतून अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली.