भारताच्या विश्वनाथन आनंद याने अर्मेनियाच्या लिवॉन आरोनियन याच्यावर शानदार विजय मिळवत झुरीच क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत हिकारू नाकामुरा (अमेरिका) याच्या साथीने आघाडी मिळविली. दुसऱ्या फेरीअखेर त्यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत.
आरोनियन, रशियाचे सर्जी कर्जाकिन व व्लादिमीर कर्जाकिन यांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. इटलीचा फॅबिआनो कारुआना याने आतापर्यंत फक्त एक गुण मिळविला आहे. नाकामुरा याला क्रामनिकने बरोबरीत रोखले, तर कारुआना याने कर्जाकिन याच्याशी बरोबरी स्वीकारली.
आनंदने आरोनियनविरुद्ध पांढऱ्या मोहरांनिशी खेळण्याचा फायदा घेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. डावाच्या सुरुवातीस आनंदने मधल्या रांगेतील प्यादे पुढे नेण्यासाठी उंटाचा बळी दिला. त्याच्या डावपेचांना तोंड देताना आरोनियन हा अनेक वेळा संभ्रमात पडला. १९ ते २१व्या चाली खेळताना त्याला एक तास वेळ लागला. डावात बरोबरीची स्थिती साधण्यासाठी आरोनियनने आपल्या मोहराचा बळी दिला, मात्र त्याच्या डावपेचांना यश मिळाले नाही. उलट आनंदनेच आणखी एक मोहरा मिळवत डावावरील पकड अधिक घट्ट केली. अखेर २८व्या चालीला आरोनियनने पराभव मान्य केला.