भारताचा माजी विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने जागतिक अजिंक्यपदाची लढत गमावली असली तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही याचाच प्रत्यय येथे पाहावयास मिळाला.
सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळाला, तुलाही हा सन्मान मिळावा असे वाटते काय असे विचारले असता तो म्हणाला, कोणत्याही पुरस्कार किंवा सन्मानाकरिता मी कधीही कोणावर दडपण आणलेले नाही. माझी लोकप्रियता हाच माझा खरा सन्मान आहे. तो माझ्यासाठी कायमच संस्मरणीय ठेवा असतो.
‘पुन्हा विश्वविजेता होईन’
वाढत्या वयाचा परिणाम विश्वविजेतेपदाच्या लढतीत दिसून आला काय यास उत्तर देताना आनंद म्हणाला, कोणत्याही खेळात वयाचा मुद्दा महत्त्वाचा असतोच. मात्र आमच्या खेळात वाढत्या वयाचा खूप परिणाम होत असेल असे मला वाटत नाही. अनेक खेळाडूंनी पन्नाशीनंतरही सर्वोच्च यश मिळविले आहे. मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या लढतीत शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती टिकविण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. विश्वविजेतेपद मिळविण्यासाठी मी अजूनही सक्षम आहे. कार्लसनने खूपच छान खेळ केला. मी जे डाव गमावले त्या डावांमध्ये माझा निसटता पराभव झाला. अर्थात मी अशा पराभवाकडे गांभीर्याने पाहात नाही. नव्या उमेदीने मी पुन्हा खेळणार आहे.
विश्वविजेत्याचा आव्हानवीर ठरविण्यासाठी पुढील वर्षी स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेत मी भाग घेणार आहे. त्या स्पर्धेसाठी मी कसून तयारी करणार आहे. लंडन क्लासिक स्पर्धेत फारसा सराव न करता मी सहभागी झालो होतो. तेथील कामगिरीविषयी मी समाधानी आहे असेही आनंदने सांगितले.
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळाचा समावेश व्हावा काय याबाबत तो म्हणाला, कोणत्याही खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्यासाठी बराच वेळ लागतो. आमच्या खेळाचा समावेश होण्यासाठी आणखी आठ वर्षे लागतील. या खेळाचा समावेश झाल्यास भारतास चांगले यश मिळविता येईल.