भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या कार्याध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा तीन वर्षांसाठी कुंबळे ही जबाबदारी सांभाळणार आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
द्रविड आणि जयवर्धने यांची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. ३१ मे ते १ जून या कालावधीत लॉर्ड्स येथे होणाऱ्या बैठकीला ते हजर असतील. आंतरराष्ट्रीय सामने खेळत असलेल्या खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून कसोटी कर्णधारांनी द्रविडच्या नावाला पसंती दर्शवली. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे त्याच्या जागी द्रविडची निवड झाली आहे.
माजी खेळाडूंच्या प्रतिनिधींनी जयवर्धनेची निवड केली असून तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरची जागा सांभाळणार आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्या जागी ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू टीम मे यांची निवड झाली आहे.