आशियाई क्रीडा स्पर्धेत मला अंतिम फेरीत स्थान मिळविता आले नसले तरी तेथे मिळविलेले कांस्यपदक माझ्यासाठी स्वप्नवत कामगिरीच आहे, हे पदक भावी कारकीर्दीसाठी प्रेरणादायकच ठरणार आहे, असे भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू अंकिता रैना हिने सांगितले.

इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने महिलांच्या एकेरीत कांस्यपदक पटकाविले. तिचे या स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. अंकिता ही मूळची गुजरातची असली, तरी ती अनेक वर्षे येथील पीवायसी हिंदू जिमखाना येथे हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. येथे सायंकाळी तिचे आगमन झाले. त्या वेळी बेंद्रे यांच्यासह तिच्या अनेक सहकारी खेळाडूंनी तिचे जल्लोषात स्वागत केले.

पत्रकारांशी संवाद साधताना ती म्हणाली, ‘‘एकेरीत मला कांस्यपदक मिळेल असे वाटले नव्हते. कारण या स्पर्धेत चीन, कझाकिस्तान व जपानच्या अनुभवी खेळाडूंचा समावेश होता. या पाश्र्वभूमीवर मी उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली, ही माझ्यासाठी खूप समाधानाची कामगिरी आहे.’’

‘‘मिश्रदुहेरीत मला पदकापासून वंचित राहावे लागले. अर्थात या स्पर्धेतील अनुभव मला विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी उपयुक्त ठरणार आहे. माझ्या वाटचालीत बेंद्रे सर व माझ्या पालकांचा मोठा वाटा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. टोकियो येथे २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी मी खूप मेहनत करणार आहे,’’ असेही रैनाने सांगितले.