ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक क्रीडापटूचे स्वप्न असते, मात्र ऑलिम्पिकमध्ये सहभागाचा मार्ग अत्यंत खडतर असतो. कारकीर्दीत सातत्याने संघर्ष केल्यानंतरही अनेकांचे ऑलिम्पिकवारीचे स्वप्न अधुरेच राहते, मात्र राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या २२ वर्षीय अपूर्वी चंडेलाचे ऑलिम्पिकवारीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. चांगवोन, कोरिया येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात अपूर्वीने १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावले. या पदकासह अपूर्वी पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. अंतिम फेरीत अपूर्वीने १८६.६ गुणांची कमाई केली. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरिता विश्वचषकात या प्रकारात तीन नेमबाजपटूंना संधी होती. १० मीटर एअर रायफल प्रकारातील अव्वल तिघींचे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. ‘विश्वचषकात पदक पटकावणे हे अनेक वर्षांचे उद्दिष्ट होते. यंदा हे उद्दिष्ट साध्य झाल्याने प्रचंड आनंद झाला आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याने आनंद द्विगुणित झाला आहे,’ असे अपूर्वीने सांगितले.