अर्जेंटिनाचे माजी प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मॅरेडोना यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या जवळील सदस्यांनी वृत्तसंस्थांना दिली आहे. १९८६ साली आपल्या बहारदार खेळाने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅरेडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं. मॅरेडोना यांच्या निधनामुळे समस्त क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा- फुटबॉलच्या जादुगाराची एक्झिट, क्रीडाविश्व हळहळलं

काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता…ज्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रीयाही झाली. यामधून सावरल्यानंतर मॅरेडोना यांना त्यांच्या मुलीच्या घरात हलवण्यात आलं होतं. ३० ऑक्टोबर रोजी मॅरेडोना यांनी आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. यानंतर अवघ्या काही दिवसांनी मॅरेडोना यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळख मिळवलेल्या मॅरेडोना यांचं करिअर चुकीच्या कारणांमुळेही चर्चेत आलं होतं.

आणखी वाचा- …आणि मॅरेडोना यांचा तो गोल ‘Hands of God’ म्हणून प्रसिद्ध झाला

ड्रग्ज सेवन, दारु यामुळे मॅरेडोन काही काळ फुटबॉलपासून दूर होते. मात्र या सर्वांवर मात करत त्यांनी २००८ साली अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दमदार पुनरागमन केलं. प्रशिक्षणाचा फारसा अनुभव नसतानाही मॅरेडोना यांनी अर्जेंटिनाच्या संघाला प्रशिक्षण देताना आपला ठसा उमटवला होता. अर्जेंटिनामधील आबालवृद्धांमध्ये मॅरेडोना यांची क्रेझ होती. १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध सामन्यात झळकावलेल्या दोन गोलमुळे मॅरेडोना चर्चेत आले होते. अखेरीस फुटबॉलच्या मैदानात घोंघावणारं वादळ शांत झालं आहे.