News Flash

नव्यांची ‘चढाई’, आव्हानांची ‘पकड’!

पूर्वी आठ संघांमध्ये जवळपास ४५ दिवस प्रो कबड्डी लीगची रंगत असायची. त्या वेळी ती यशस्वी झाली.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत केणी

भारतीय हौशी कबड्डी महासंघ कार्यरत नसल्यामुळे निर्माण झालेली दिशाहीनता आणि आशियाई क्रीडा स्पध्रेत हक्काचे सुवर्णपदक गमावून समाधान मानावे लागणारे कांस्यपदक यामुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रशासक हवालदिल झाले होते. या आव्हानात्मक परिस्थितीत प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वाच्या यशस्वितेतून अनेक मुद्दे समोर येतात. गेली अनेक वर्षे प्रो कबड्डीच्या व्यासपीठावर वर्चस्व निर्माण करणाऱ्या जुन्या खेळाडूंची जागा यंदा ताज्या दमाच्या नव्या खेळाडूंनी घेतली आहे. परंतु तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लीगचे शिवधनुष्य पेलताना लोकप्रियतेचा आलेख सांभाळणे कठीण जात असल्यामुळे योग्य परिवर्तनाचीही आवश्यकता आहे.

पूर्वी आठ संघांमध्ये जवळपास ४५ दिवस प्रो कबड्डी लीगची रंगत असायची. त्या वेळी ती यशस्वी झाली. परंतु १२ संघांमध्ये ८५ दिवसांचा लीगचा विस्तार करताना ती एखाद्या फुग्याप्रमाणे ताणली गेली. कारण प्रत्येक संघाला या कालावधीत किमान २२ ते २६ सामने खेळणे अपरिहार्य आहे. दिवस आणि सामन्यांचे गणित केल्यास हे समीकरण चुकीचे नाही, परंतु वारंवार प्रवासाचा त्रास, बदललेले वातावरण आणि लिलावात बोली लावणाऱ्या फ्रेंचायझींच्या अपेक्षा याचा परिणाम खेळाडूंवर होत असतो. त्यामुळेच खेळाडूंची अपेक्षित कामगिरी मंदावते. यंदाच्या हंगामाच्या प्रारंभी अनुकूलतेपेक्षा प्रतिकूलताच अधिक होती, पण तरीही या हंगामाचा यशस्वीपणे समारोप झाला. कबड्डीवर एकछत्री अंमल असणाऱ्या जनार्दनसिंह गेहलोत यांच्या जोखडातून बाहेर पडल्यानंतर ही तशी पहिलीच स्पर्धा होती. मात्र प्रो कबड्डीच्या निमित्ताने मागील पाच हंगाम देशभराचे दौरे करणाऱ्या आणि व्यासपीठावर अग्रेसर असणाऱ्या गेहलोत कुटुंबाची उणीव कुठेच भासली नाही.

अनेक जुन्या आणि अनुभवी कबड्डीपटूंची सद्दी संपत असल्याचे यंदाच्या हंगामाने अधोरेखित केले. राकेश कुमारने काळाची पावले ओळखत विश्लेषकाचा मार्ग पत्करला, तर प्रो कबड्डीच्या यशात आपल्या शांत नेतृत्वक्षमतेचा आणि हुकमी खेळाचा ठसा उमटवणाऱ्या अनुप कुमारने निवृत्तीचे धारिष्टय़ दाखवले.

जयपूर पिंक पँथर्सचे नेतृत्व करणाऱ्या अनुपला १३ सामन्यांत जेमतेम ५० गुण मिळवता आले होते. याशिवाय मनजीत चिल्लर (१९ सामन्यांत ६७ गुण), जीवा कुमार (१९ सामन्यांत ४० गुण), धरमराज चेरलाथन (२२ सामन्यांत ४० गुण), जसवीर सिंह (१६ सामन्यांत ४६ गुण), सुकेश हेगडे (१७ सामन्यांत ४० गुण), काशिलिंग आडके (१९ सामन्यांत ८२ गुण) आणि यांग कुन ली (१८ सामन्यांत ८२ गुण) यांना आपला प्रभाव पाडता आला नाही. कोटय़वधी नितीन तोमर (११ सामन्यांत १०२ गुण) दुखापतीमुळे फारसे सामने खेळू शकला नाही, तर मोनू गोयत खेळ उंचावू शकला नाही आणि रिशांक देवाडिगाही (२३ सामन्यांत १०० गुण) अपयशी ठरला. याचप्रमाणे भारताचा कर्णधार अजय ठाकूर सांघिक समीकरण न जुळल्यामुळे संघाला तारू शकला नाही.

प्रो कबड्डीच्या यंदाच्या हंगामात पवन शेरावत (२३ सामन्यांत २६० गुण), सिद्धार्थ देसाई (२१ सामन्यांत २२१ गुण), मणिंदर सिंग (२२ सामन्यांत २०६ गुण), सचिन तन्वर (२२ सामन्यांत १९४ गुण), नवीन कुमार (२२ सामन्यांत १७७ गुण), चंद्रन रंजित (२४ सामन्यांत १५८ गुण), के. प्रपंजन (२१ सामन्यांत ११८ गुण), श्रीकांत जाधव (२५ सामन्यांत १४६ गुण), नीतेश कुमार (२५ सामन्यांत १०१ गुण), परवेश भन्सवाल (२४ सामन्यांत ८४ गुण) अशा अनेक तरुण खेळाडूंनी आपली छाप पाडली. यापैकी बऱ्याच खेळाडूंना युवा गुणवान उपक्रमाद्वारे सहा लाख ६० हजार रुपयांच्या मानधनावर संघात स्थान देण्यात आले होते.

यंदाच्या हंगामात सहा मातबर खेळाडूंवर कोटय़वधी रुपयांच्या बोलीची जोखीम फ्रेंचायझींनी पत्करली होती. मात्र या गुंतवणुकीत आलेल्या अपयशाचे दूरगामी परिणाम पुढील हंगामाच्या लिलावात दिसून येतील. मोठय़ा खेळाडूंवर कोटय़वधी रक्कम न उधळता सरासरी रकमेची बोली लावणेच फ्रेंचायझी पसंत करतील, अशी चिन्हे आहेत. मात्र उदयोन्मुख खेळाडूंचा आर्थिक स्तर त्यांच्या कामगिरीमुळे निश्चितपणे उंचावेल.

गेल्या काही वर्षांत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या लोकप्रियतेत एकीकडे घट होत असताना १०० चेंडूंचा सामना, टेन-१० सामना असे नवे प्रयोग त्याची जागा घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. क्रिकेटचे हंगाम आयपीएलच्या पलीकडे अनेक छोटय़ा-मोठय़ा मालिका आणि स्पर्धामुळे वर्षभर व्यग्र असतो. कबड्डीच्या हंगामात प्रो कबड्डी आणि चार वर्षांनी आलेले एशियाड किंवा विश्वचषक यापलीकडे कोणत्याही स्पर्धाना फारसे स्थान नाही. दुबईतील आंतरराष्ट्रीय स्पध्रेचा घाट अपयशी ठरला होता. तूर्तास, प्रो कबड्डी लीग आता आत्मपरीक्षणाच्या उंबरठय़ावर असताना कबड्डीच्या हंगामालाही संजीवनी देण्याची नितांत गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 1:44 am

Web Title: article about necessary change requirement in kabaddi
Next Stories
1 महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-दिविज यांना विजेतेपद
2 नोवाक जोकोविचला  पराभवाचा धक्का
3 आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : भारताची सलामी थायलंडशी
Just Now!
X