डॉ. प्रकाश परांजपे

आजच्या आकृतीत डावातले चारही हात दिले आहेत. ठेका मुम्ब्री बदामचा आहे. पश्चिमेने किलवर छक्कीची उतारी केली. प्रश्न असा होता की ‘उद’ जोडीचे दस्त १२ होतील की १३? उत्तरासाठी आपण प्रथम खेळ कसा होईल, त्याची कल्पना करू या. पहिला दस्त किलवर ६-२-७-एक्का असा होईल, तो दक्षिण किलवर एक्क्याने जिंकेल. मग दक्षिण गावातले हुकूम काढून टाकेल. दुसरा दस्त बदाम एक्का-६-२-५ असा तर तिसरा बदाम राजा-७-३-किलवर ८ असा होईल. पूर्वेच्या खेळाडूकडे बदामचं दुसरं पान नसल्यामुळे तो त्यावर एखादं हलकं पान, म्हणजे या ठिकाणी किलवर अठ्ठी जाळेल. यापुढचा खेळ कसा होईल?

दक्षिणेकडे ७ बदाम, ३ चौकट आणि किलवर एक्का असे ११ दस्त सरळसरळ आहेत (चौकट पंथात उत्तरेच्या एक्क्याची मदत जमेस धरली आहे. ब्रिजमध्ये ‘उद’ जोडी विरुद्ध ‘पपू’ जोडी असा संघर्ष असतो, त्यामुळे दस्त हे जोडीच्या नावावर जमा होतात, एकटय़ा खेळाडूच्या नव्हे.) इस्पिक एक्का बारावा दस्त देईल. मात्र दक्षिण खेळाडूने तो ‘वाजवून’ घेतला तर काय होईल? दक्षिण जेव्हा इस्पिक एक्का आपल्या हातातून दस्ताची पहिली उतारी म्हणून खेळेल, तेव्हा ‘पपू’ त्यावर आपापल्या हातातील छोटी पानं खेळतील, तो दस्त इस्पिक एक्का-५-२-दश्शी असा खेळला जाईल. पुढे जेव्हा दक्षिणेला इस्पिक राणी खेळण्याची वेळ येईल, तेव्हा पूर्वेच्या हातात त्या राणीच्या समाचाराकरिता राजा तयार असेल, म्हणजे तो दस्त ‘पपू’ जोडी जिंकेल. ‘उद’ जोडीचे फक्त १२ दस्त होतील.

१३वा दस्त जिंकण्यासाठी दक्षिणेला ‘फिनेस’ तंत्राचा उपयोग करावा लागेल. यातली खुबी अशी. नियमाप्रमाणे जो खेळाडू दस्त जिंकतो, तो पुढच्या दस्ताचं पहिलं पान खेळतो. ठेकेदार जेव्हा उत्तरेच्या चौकट एक्क्याने दस्त जिंकेल, तेव्हा पुढच्या दस्ताचं पहिलं पान त्याला उत्तरेच्या हातातून खेळता येईल. उत्तरेच्या हातातून तो इस्पिक दुरी खेळेल. पुढचं पान खेळण्याची पाळी पूर्वेची!

जर पूर्व छोटं पान खेळला तर दक्षिण इस्पिक राणी खेळेल. पश्चिमेच्या हातात राणीपेक्षा भारी पान नाही, त्यामुळे राणी दस्त जिंकेल. नंतर इस्पिक एक्क्याचा त्याच्या मगदुराप्रमाणे एक दस्त होईलच. अशा प्रकारे दक्षिण एकूण १३ दस्त जिंकेल. जर उत्तरेच्या इस्पिक पानावर पूर्व राजा खेळला तर दक्षिण एक्का खेळून तो दस्त जिंकेल आणि मग इस्पिक राणी हेच गावात उरलेलं भारी पान असल्यामुळे राणीचा दस्तही दक्षिणच जिंकेल. पूर्वेने काहीही केलं तरी ‘उद’ जोडीचे १३ दस्त होतील. अशा प्रकारे राजाला बगल देऊन दक्षिणेला १३ दस्त करता येतील, मुम्ब्री बदामचा ठेका यशस्वी होईल!

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com