डॉ. प्रकाश परांजपे

राणी बगलेत असेल की नसेल, हा प्रश्न वरचेवर ब्रिज खेळाडूंसमोर उभा राहात असतो. त्याचं योग्य उत्तर डावाप्रमाणे, प्रसंगाप्रमाणे शोधावं लागतं. क्लिष्ट गणितं सोडवायचं राहू द्या, पण ती साधी मनात मांडायला पण पुरेसा वेळ उपलब्ध नसतो. अशा वेळी ब्रिज खेळाडूंना उपयोगी पडतात ते ब्रिजचे ठोकताळे, प्राप्त परिस्थितीत वापरता येण्यासारखे सोपे यम-नियम. मेरुप्रस्तार किंवा तत्सम पद्धती वापरून आपण हे  ठोकताळे यथावकाश तपासू शकतो. प्रत्यक्ष खेळताना ब्रिजच्या ठोकताळ्यांची जंत्री मनात तयार असणं महत्त्वाचं आहे.

याचं एक उदाहरण म्हणजे चित्रातला डाव. दक्षिण वण्टक होता. त्याने १५-१७ चित्रगुण दाखविण्यासाठी १ चौकट बोलीने खातं खोललं. पश्चिमेच्या पास नंतर १ इस्पिक बोलून उत्तर खेळाडूने ७-९ चित्रगुण दाखवले. यानंतर उ-द जोडी आपापल्या हातातले पंथ दाखवून ३ बिनहुकमीच्या शतकी ठेक्यापर्यंत पोचली. पश्चिमेने इस्पिक राजाची उतारी केली. यानंतर दक्षिण खेळाडूने आपल्या खेळाची आखणी कशी करावी?

एक्का सोडला तर इस्पिक आणि बदाम या दोन्ही ज्येष्ठ पंथांत उ-द जोडीच्या हातात अंधारच आहे. चौकट आणि किलवर पंथांतली राणी गावात आहे. प-पू जोडीला यातल्या कुठल्याही राणीद्वारे उतारी हातात मिळाली तर त्यांचे इस्पिकमध्ये चार दस्त छापलेले आहेत. दक्षिण खेळाडूला अशी योजना करणं जरुरी आहे की जेणेकरून उतारी प्रतिस्पध्र्याकडे न जाता ९ दस्त मिळतील.

चौकट पंथात उ-द जोडीकडे मिळून ८ पानं आहेत तर किलवर पंथात ९. पहिल्या किंवा दुसऱ्या दस्ताला इस्पिक एक्का जिंकून दक्षिण किलवर पंथाकडे मोर्चा वळवेल. त्यामध्ये ठेकेदारीत ९ पानं असल्याने एक्का-राजा खेळल्यावर राणीचा पाडाव होण्याची शक्यता जास्त आहे. अर्थातच पहिल्यांदा किलवर एक्का खेळून प्रतिपक्षाची पानं बघणं जरुरी आहे. जर एक्क्यावर पश्चिमेने पान दिलं नाही तर चौकट एक्क्याने बघ्याच्या हातात जाऊन पूर्वेच्या राणीला बगलेत घेता येतं. जर किलवर एक्क्यावर प-पू दोघांनीही पान दिलं तर याच प्रकारे चौकट एक्का खेळून चौकट राणीची पडताळणी करणं हेही योग्य आहे.

यानंतर किलवर राजा खेळायचा. यावर जर राणी पडली तर किलवर पंथात ६ दस्त मिळून ठेका यशस्वी होईल. पण वरील डावात पश्चिमेकडे तीन पानी किलवर राणी आहे त्यामुळे त्या पंथात दोनच्या पलीकडे दस्त मिळणे दुरापास्त आहे. अशा प्रकारे किलवर एक्का-चौकट एक्का-किलवर राजा खेळून दक्षिण जेव्हा चौकट दश्शी खेळेल, आणि पश्चिम छोटं पान टाकेल तेव्हा बघ्याच्या हातातून छोटं पान टाकून राणीला बगलेत घेण्याचा प्रयत्न करायचा की राजा खेळून राणी पडेल अशी आशा धरायची हा निर्णय दक्षिणेला करावा लागेल.

या ठिकाणी उपयोगी पडेल असा ठोकताळा म्हणजे  ‘आठ (बगलेत) असेल, नऊ नसेल‘. चित्रात उ-द जोडीकडे चौकटची एकूण ८ पानं आहेत, म्हणून ‘बगलेत घेणं‘ हीच श्रेयस्कर चाल. याप्रमाणे उत्तरेच्या हातातून छोटं पान खेळून दक्षिण खेळाडू चौकट पंथात ५ दस्त मिळवेल आणि ठेका वटवेल!

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)