डॉ. प्रकाश परांजपे

‘‘छोटू, पत्ते कुठे आहेत?’’ आबांनी विचारलं. ‘‘फटाक्यांच्या मागे आहेत, आबा. नरेशभाई म्हणतात, दिवाळीत फटाके वाजवले तर प्रदूषण होतं. आम्ही ते आता नाताळ नाही तर नवीन वर्षी वाजवू. मी येतोच आहे,’’ असं छोटू आतल्या खोलीतून म्हणाला.

‘‘आबा, आमच्या अमेरिकेतली लोकशाही म्हणजे एकदम आदर्श. प्रत्येक माणसाला आणि मताला महत्त्व असतं अमेरिकेत. म्हणून मतमोजणी बरेच दिवस चालते. घाई करून चालत नाही,’’ असं पत्ते मिळेपर्यंत ख्रिस मेनन आबांना सांगत होता. भातखंडे आज उशिरा येणार होते आणि जाधव गावी गेले होते. पण मेनन बंधू हजर होते.

एवढय़ात पिंकीनं पत्ते शोधून आणले आणि झटपट वाटून डाव चालू केला. ‘‘येन काई रोमबा सुमार (माझ्याकडे भिकार डाव आहे), पास,’’ पिंकी म्हणाली. तिची ब्युटी पार्लरवाली तमीळ होती, म्हणून ती तमीळ शिकत होती. पूर्वेच्या पासनंतर आबा १ किलवर (१२-१४ चित्रगुण) बोलले. ख्रिस मेनन थेट ४ इस्पिक बोलला आणि पास-पास-पास होऊन ४ इस्पिकचा ठेका पक्का झाला.

पिंकीने बदाम दुरीची भवानीची उतारी केली. भास्कर मेननने त्याची पानं पटावर पसरली. ख्रिस मेनन पटावरून राजा खेळला आणि आबा एक्का खेळणार एवढय़ात ख्रिसनं त्याची पानंही आबांना दाखवून दहा दस्तांचा दावा केला. ‘‘बदाम एक्का आणि इस्पिक एक्का-राजा हे तीन दस्त तुम्हाला, बाकी १० आमचे, तुमची बाकी पानं फडतूस आहेत,’’ तो म्हणाला.

आबांना हा दावा मुळीच मान्य नव्हता. ‘‘आमच्याकडे प्रत्येक पानाला महत्त्व असतं, राधाकृष्णा,’’ आबा म्हणाले. जरा ३-४ दस्त खेळून झाल्यावर पुनर्मोजणी करू या. बदाम एक्का घेऊन दुसऱ्या दस्ताला आबांनी बदाम छक्की लावली. छोटय़ा इस्पिकच्या पानानं, म्हणजे दुरी किंवा तिरीने मारती घेतली तर पिंकीला इस्पिक ४, ५, किंवा ७ खेळून वरमारती घेता येईल आणि ठेका तिथेच बुडेल, हे ख्रिसच्या लक्षात आलं. त्याने इस्पिक अठ्ठीने मारती घेतली. पिंकीनं त्यावर चौकट दुरी जाळली.

इथे ख्रिसला उ-द जोडीच्या हातातले हुकूम काढणं भाग होतं. ख्रिस इस्पिक राणी खेळला. आबा इस्पिक राजा खेळून तो दस्त जिंकले आणि त्यांनी पुन्हा एकदा बदामचं पान, बदाम सत्ती लावली. पुन्हा एकदा ख्रिसला मोठय़ा इस्पिकच्या पानानं मारती घ्यावी लागली. या वेळी ख्रिस इस्पिक नश्शी खेळला. पिंकीनं त्यावर आणखीन एक चौकट जाळलं. आता ख्रिसच्या हातात इस्पिक गुलाम आणि दश्शी ही दोनच मोठी पानं उरली होती आणि त्याचा चेहरा गोरामोरा झाला होता. इस्पिक गुलाम खेळताना त्याचा हात थरथरत होता. आबा एक्का जिंकून आणखीन एक बदाम पान – अठ्ठी – खेळले. ख्रिसकडे इस्पिक १०-३-२ अशी पानं उरली होती, तर पिंकीकडे इस्पिक सत्ती. त्याने इस्पिक दश्शीने मारती घेतली असती तर पिंकीच्या सत्तीचा

नंतर दस्त झाला असता आणि त्याने छोटय़ा इस्पिकने मारती घेतली असती तर पिंकीला

सत्तीने वरमारती घेता आली असती!

ख्रिस मेनननं गुपचूप हार मान्य केली. ठेका एका दस्ताने बुडाला. बदाम सत्तीला ‘ट्रम्प प्रमोशन’ म्हणजे ‘बढती मिळाली’.

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)