डॉ. प्रकाश परांजपे

ब्रिज या खेळावर मुबलक लिखाण उपलब्ध आहे. त्यातील बरंचसं इंग्रजी भाषेत आहे आणि त्या अनुषंगाने ब्रिजची परिभाषा विकसित झालेली आहे. मराठी भाषेत मात्र ब्रिजचं फारसं साहित्य निर्माण झालेलं नाही. १९५८मध्ये के. डी. जोशी यांनी लिहिलेलं एक पुस्तक आणि १९८०च्या दशकात शरद जोशी यांनी चालविलेलं ब्रिज हे नियतकालिक यासारखे काही प्रयत्न हे त्या नियमाला असलेले मोजके अपवाद.

ब्रिज खेळणारी मराठी मंडळी बरीच होती, अजूनही आहेत. त्यांची चर्चा मराठीतच होते. त्यातलेच शब्द वापरून, पण जिथे एका शब्दाचे दोन-तीन अर्थ प्रचारात आहेत, तिथे मळलेली वाट न वापरता एखादा योग्य तो प्रतिशब्द निवडून ब्रिज शिकण्याचं आपलं काम जास्त सोपं करता येईल का, याचा विचार आपण करणार आहोत.

उदाहरणार्थ ‘दस्त’ हा शब्द नियमित ब्रिज खेळणाऱ्यांना थोडा खटकतो़  कारण ‘हात’ हा शब्द त्यांच्या जास्त अंगवळणी पडला आहे. मात्र हात हा शब्द हा दोन-तीन अर्थाने वापरला जातो. त्यामुळे दस्त हा शब्द ‘खेळलेल्या पानांनी झालेला’ असा वापरून आपण समजुतीचा गोंधळ टाळणार आहोत. याच प्रकारे बदाम आणि चौकट हे एकाच रंगाचे, पण वेगळ्या पंथाचे पत्ते आहेत असा उल्लेख करून आपण तिथेही परिभाषा सोपी व नेमकी अवलंबणार आहोत.

पनवेलचे यशोधन गोसावी यांनी असाही एक प्रश्न उपस्थित केला की, ‘‘लेखांमध्ये दक्षिण, उत्तर असा दिशांचा उल्लेख का केला आहे?’’ या प्रश्नाचं उत्तर वरच्या चित्रावरून तुमच्या सहज लक्षात येईल. ब्रिजचा प्रत्येक डाव बहुधा दोन किंवा जास्त ठिकाणी खेळला जातो. एक दस्त खेळून झाला की ब्रिज खेळाडू खेळलेलं पान आपल्यासमोर उपडं ठेवतात, सगळी पानं मिसळून टाकत नाहीत. पूर्ण डाव खेळून झाला की डावाची प्रत्येक खेळाडूची पानं चित्रातील बोर्डमध्ये वेगवेगळी राहतात. हा बोर्ड मग दुसऱ्या टेबलवर, किंवा दुसऱ्या खोलीत वेगळे खेळाडू खेळतात. डावाची चर्चा होताना साहजिकच खेळाडू एकमेकांना विचारतात की, ‘‘तू या डावात कुठे बसला होतास?’’ किंवा ‘‘या डावात तुझ्या हातात कुठली पानं होती?’’ या वेळी दिशांचा चांगला उपयोग होतो. चित्रातल्या बोर्डवर दिशा ठळकपणे नमूद केल्या आहेत ते याचसाठी.

याचाच पुढचा भाग म्हणजे जागा कमी असेल तर आपण उत्तर-दक्षिण जोडीचा उल्लेख ‘उद’ आणि पश्चिम-पूर्व जोडीचा उल्लेख ‘पपू’ असा करू शकतो. ही परिभाषा ब्रिज शिकण्याचा आपला मार्ग सुकर करेल.

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com