डॉ. प्रकाश परांजपे

आठ नोव्हेंबरला पुलंच्या १०१व्या जन्मशताब्दीनिमित्त ऑनलाइन प्रदर्शनाचं नवीन दालन उघडताना ‘गुगल’ने म्हणे अंतू बव्र्याला अमेरिकेच्या निवडणुकीबद्दल विचारलं. ‘‘पुण्याच्या नाना दामल्यांना द्या ठेका, हा हा म्हणता मोजणी करून नव्या अध्यक्षाला बोहल्यावर उभा करतील,’’ अंतूशेट उत्तरला.

दुसऱ्याच दिवशी झालेल्या ऑनलाइन ब्रिज स्पर्धात ८५ वर्षांचे नाना दामले आणि त्यांचे ९२ वर्षांचे ज्येष्ठ भिडू दामुअण्णा जोगळेकर यांनी ४२ जोडय़ांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. चित्रात दिलेल्या डावात त्यांनी उत्कृष्ट बचाव देऊन ठेकेदाराला १ बिहूच्या ठेक्यात पाणी पाजलं.

वण्टक नाना दामलेंनी पास म्हटलं आणि उत्तर खेळाडूनं १ बिहू बोली दिली. उ-द जोडीच्या बोलीभाषेमध्ये त्याचा अर्थ १४-१६ चित्रगुण आणि समतोल डाव असा होता. इतर तिघांनी नंतर पास दिल्यामुळे १बिहूचा ठेका ठरला. केडी जोशी बोलीभाषेत या डावाचा लिलाव उत्तर : १ चौकट (१५-१७ चित्रगुण); दक्षिण : १ बदाम (०-५ चित्रगुण); उत्तर : १ बिहू , असा बोलला गेला असता.

दामुअण्णांनी लांब इस्पिक पंथाचं वरून चौथं पान या न्यायाने इस्पिक दुरीची भवानीची उतारी केली. नाना दामल्यांनी ‘तिसऱ्या हाती मोठं पान’ या न्यायाने पहिल्या दस्ताला इस्पिक राणी दिली आणि ठेकेदारानं इस्पिक एक्क्यानं पहिला दस्त जिंकला. दुसऱ्या दस्ताला त्यानं चौकट गुलाम लावला. नाना दामल्यांनी चौकट राजा जिंकून इस्पिक छक्की लावली. यावर जर ठेकेदारानं राजा खेळला असता तर त्याचे ७ दस्त कदाचित झालेही असते, पण तो यांत्रिकपणे छोटं पान – इस्पिक चव्वी – खेळला. दामुअण्णांनी इस्पिक दश्शीने तो दस्त जिंकला. इस्पिक राणी-८-६ अशी पानं असती तर नानांनी अठ्ठी लावली असती आणि राजा-राणी-६ अशी पानं असती तर ते छक्कीच्या आधी नक्कीच राजा खेळले असते. याचा अर्थ इस्पिक पंथात हाताला काही आणखीन लागण्यासारखं नव्हतं. ते बरोब्बर ओळखून दामुअण्णांनी आपला मोर्चा बदामकडे वळवला. चौकट-इस्पिकमध्ये ठेकेदाराकडे ४-४ पानं असावीत, म्हणजे बदाम पंथात दोन किंवा तीनच. त्याअर्थी भिडूकडे ४ किंवा ५ असणार. या पंथाचे दस्त वाजवायला काही अडथळा येऊ नये म्हणून दामुअण्णांनी पुढच्या दस्ताला सरळ बदाम राणीचीच उतारी केली.

ठेकेदारानं बघ्याच्या हातातून छोटं पान खेळून दामुअण्णांना तो दस्त जिंकू दिला. त्यांनीही बदामवरचं आक्रमण बदाम नव्वी खेळून चालू ठेवलं. नाना दामल्यांनी काळजीपूर्वक बदाम सत्ती खेळून तो दस्त ठेकेदाराला जिंकू दिला. दस्त न जिंकू शकणाऱ्या पानांमध्ये लहान-मोठं असा भेद करून या पानांचा सांकेतिक उपयोग करण्याची कला ही ब्रिजची आणखीन एक खुबी. इथे बदाम चव्वी मागे ठेवून पंजी-सत्ती खेळून बदाम पंथ आपल्याला पथ्यावर पडणार आहे, हा संकेत नाना दामल्यांनी भिडूला दिला.

ठेकेदारानं बदाम गुलाम जिंकून चौकट राणी लावली. दामुअण्णांनी चौकट एक्का जिंकून हातातलं शेवटचं बदाम पटावर ठेवलं. पुढचे तीन दस्त नाना दामल्यांचे झाले. १ बिनहुकमीचा ठेका एका दस्ताने बुडाला. स्पर्धेतला हा शेवटचा डाव होता. थोडय़ाच वेळात गुणमोजणी होऊन दामुअण्णा जोगळेकर आणि नाना दामले यांनी स्पर्धा जिंकली होती, हे स्पष्ट झालं.

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)