प्रशांत केणी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) प्रस्तावित कसोटी धोरणामुळे सध्या जागतिक क्रिकेटमध्ये दोन गट पडले आहेत. २०२३पासून कसोटी सामने पाच दिवसांऐवजी चार दिवसांचे करण्यासाठी ‘आयसीसी’ प्रयत्नशील आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे प्रमाण वेगाने वाढते आहे, तर कसोटीसंख्येत घट होते आहे. त्यामुळेच कसोटीचा एक दिवस वजा करून तो उपलब्ध करण्याची उपाययोजना आखली जात आहे.

गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तरी ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांच्या संख्येत झालेली वाढ आणि कसोटी सामन्यांत झालेली घट प्रकर्षांने दिसून येते. २०१९ या वर्षांतील ६७ टक्के सामने पाच पूर्ण दिवस चालू शकले नाहीत. जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१९ या वर्षांतील निकाली कसोटी सामन्यांचा आढावा घेतल्यास ३४९ पैकी २०० सामने (म्हणजेच ५७.७ %) चार दिवसांत संपले, तर १४९ सामने पाचव्या दिवशी संपले. एकीकडे कसोटी क्रिकेट टिकवण्यासाठी प्रकाशझोतातील कसोटीपर्वाला प्रारंभ झाला असला तरी कमी दिवसांत निकाली ठरणाऱ्या सामन्यांमध्ये कमालीची वाढ हाच मुद्दा ‘आयसीसी’ला महत्त्वाचा वाटतो आहे.

कसोटी क्रिकेटचे पर्व प्रारंभ झाल्यानंतर पहिली ५० वर्षे इंग्लंडमध्ये तीन दिवसांची कसोटी खेळली जायची, तर ऑस्ट्रेलियात अमर्यादित स्वरूपाची. १९३०पासून इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस कसोटी सामने चार दिवसांचे झाले, तर अन्य देश तीन दिवसांची कसोटी खेळायचे. १९४८पासून अ‍ॅशेस कसोटी सामने पाच दिवसांचे झाले, पण तरीही १९४९च्या उत्तरार्धापर्यंत इंग्लंड संघ तीन दिवसांचे कसोटी सामनेसुद्धा खेळला. १९३३-३४मध्ये भारतात झालेली पहिली कसोटी चार दिवसांची होती. १९५२पासून काही देश पाच दिवसांचे कसोटी सामने खेळू लागले. पण तरीही पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका हे देश तीन, चार, पाच, सहा किंवा अमर्यादित स्वरूपाचे कसोटी सामने खेळत होते. अखेरीस १९५७मध्ये कसोटी क्रिकेट पाच दिवसांची असावी, असे प्रमाणीकरण करण्यात आले. निश्चित निकाल लागावा, या उद्देशाने कसोटी क्रिकेटमध्ये झालेल्या १०० अमर्यादित स्वरूपाच्या कसोटी सामन्यांमध्ये ९६ सामने निकाली ठरले होते, तर चार सामने अनिर्णीत राखावे लागले. त्या काळातील तीन किंवा चार दिवसांच्या कसोटी सामन्यांतसुद्धा निकाली ठरण्याचे प्रमाणे ५५ टक्क्यांनजीक होते.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटवाढीचाच परिणाम म्हणून १९८०च्या दशकात कसोटी क्रिकेटमधील विश्रांतीचा दिवस कमी करण्यात आला. तोवर तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या खेळाच्या मधील एक दिवस दोन्ही संघांना विश्रांती असायची. इंग्लंडसारख्या देशात तर हा दिवस प्रामुख्याने रविवारीच असायचा.

कसोटी या क्रिकेटच्या पारंपरिक प्रकाराच्या अनेक आख्यायिका अस्तित्वात आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा कसोटी सामना ३ ते १४ मार्च, १९३९ या कालावधीत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. त्या काळात कसोटी सामन्यांना मर्यादित स्वरूपाचे नियम नसल्यामुळेच तो अमर्यादित स्वरूपाचा होता. या सामन्यातील १२ पैकी नऊ दिवसांचा खेळ झाला. कारण दोन दिवस विश्रांतीचे होते, तर पावसामुळे एक दिवस खेळ होऊ शकला नाही. या सामन्यात ५४४७ चेंडूंत १९८१ धावा झाल्या. परंतु इंग्लंडला मायदेशी परतण्याचे आपले जहाज चुकवायचे नसल्याने दोन्ही संघांनी चर्चा करून दरबानचा सामना अनिर्णीत राखला.

काही वर्षांपूर्वी अनिर्णीत सामन्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे कसोटी सामने निकाली ठरावे यासाठी षटकांच्या मर्यादा असलेल्या दोन डावांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यात दोन्ही संघांना पहिल्या डावात प्रत्येकी १२५ आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी १०० षटके खेळायला मिळावी, असे प्रस्तावित होते. परंतु हवामान वा अन्य कारणास्तव षटके वाया गेल्यास त्याची भरपाई कशी करावी आणि कसोटीला षटकांच्या बंधनात ठेवावे का, असे अनेक आक्षेप पुढे आले. ऑस्ट्रेलियाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही वर्षांपूर्वी दोन डावांच्या एकदिवसीय सामन्याचा प्रयोग केला होता. यात पहिले डाव प्रत्येकी २० षटकांचे आणि दुसरे डाव प्रत्येकी २५ षटकांचे दोन्ही संघांना खेळायला मिळायचे. याच धर्तीवर प्रत्येकी २५ षटकांच्या दोन डावांचे एकदिवसीय सामने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळवावेत, अशी संकल्पना सचिन तेंडुलकरने मांडली होती.

सध्या क्रिकेटमधील परंपरावादी मंडळी पाच दिवसांच्या क्रिकेटबाबत ठाम आहेत, तर चार दिवसांच्या कसोटी प्रस्तावाचे स्वागत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी त्यांची पाच दिवस टिकाव धरण्याचीही कुवत नसल्याचे अधोरेखित झाले. तसे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेटमधील वर्चस्व कुणीच नाकारू शकणार नाही. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने याच तीन राष्ट्रांचा समावेश असलेल्या चौरंगी क्रिकेट स्पध्रेची संकल्पना मांडली होती. मर्यादित षटकांच्या जागतिक स्पर्धाची संख्यासुद्धा वाढली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद हे केवळ कसोटी क्रिकेट टिकवण्यासाठी ‘आयसीसी’चेही प्रामाणिक प्रयत्न चालू असल्याचे दिखाऊ अधिष्ठान आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटसाठी हा खऱ्या अर्थाने कसोटीचा क्षण आहे.

तीन वर्षांचा तुलनात्मक आढावा

वर्ष       कसोटी   एकदिवसीय     ट्वेन्टी-२०

२०१७     ४७      १३१                  ६४

२०१८     ४८       १२८            ८३

२०१९     ४०        १५८            ३३१

prashant.keni@expressindia.com