ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर अ‍ॅशेस क्रिकेट मालिकेतील बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडला २५१ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने २५१ धावांनी विजय मिळवत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. स्टीव्ह स्मिथचे दोनही डावात शतक आणि फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने दुसऱ्या डावात घेतलेल्या ६ गड्यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने हा विजय साकारला. महत्वाचे म्हणजे या विजयासह बर्मिंगहॅममधील एजबस्टन स्टेडियममध्ये तब्बल १८ वर्षांनी ऑस्ट्रेलियाने कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. इतकेच नव्हे तर एजबस्टनमध्ये एकदिवसीय, टी २० किंवा कसोटी या तीनपैकी कोणत्याही प्रकारातील हा २०१५ नंतरचा पहिला पराभव ठरला.

विजयासाठी ३९८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ५२.३ षटकांत १४६ धावांमध्ये कोसळला. इंग्लंडने बिनबाद १३ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. पहिल्या डावातील शतकवीर रोरी बर्न्स याची विकेट त्यांनी लगेचच गमावली. पॅट कमिन्सच्या षटकांत नॅथन लायनने त्याचा झेल घेतला. जेसन रॉय व कर्णधार जो रूट यांनी ४१ धावांची भागीदारी केली. ही जोडी मोठी खेळी करणार असे वाटले होते. तथापि लायनने रॉयचा २८ धावांवर त्रिफळा उडवत त्यांच्या डावास खिंडार पाडले. त्याने पाठोपाठ जो डेन्ली (११) व रूट (२८) यांना बाद करीत इंग्लंडची दयनीय स्थिती केली.

लायनने भरवशाचा फलंदाज बेन स्टोक्‍सलाही झटपट बाद केले. स्टोक्‍सला केवळ ६ धावाच करता आल्या. त्याआधी कमिन्सने जॉनी बेअरस्टो याला बाद करीत संघाच्या विजयाच्या मार्गातील आणखी एक अडसर दूर केला होता. स्टोक्‍स बाद झाला त्यावेळी इंग्लंडची अवस्था ७ बाद ९७ अशी होती. ख्रिस वोक्सने आक्रमक सुरूवात केली. त्याने पाच चौकार मारले. पण त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही.

चहापानापूर्वी इंग्लंडचा मोईन अली बाद झाला. त्याला बाद करीत लायनने एकाच डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला. पाठोपाठ त्याने स्टुअर्ट ब्रॉडला शून्यावरच बाद करीत त्यांची ९ बाद १३६ अशी स्थिती केली. एका बाजूने झुंजार खेळ करणाऱ्या ख्रिस वोक्सने ७ चौकारांसह ३७ धावा केल्या. पण कमिन्सने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.