स्मिथची आणखी एक झुंजार खेळी

लंडन : जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यापुढे (६/६२) ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. परंतु स्टीव्ह स्मिथच्या आणखी एका झुंजार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सव्वादोनशे धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. पण पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर मात्र इंग्लंडने एकूण ७८ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडने बिनबाद ९ अशी दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे.

डावाच्या दुसऱ्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला फक्त ५ धावांवर आर्चरने बाद केले. यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोने त्याचा झेल घेतला. त्यानंतर स्मिथने मार्नस लॅबूशेनच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ६९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आर्चरनेच लॅबूशेनला (४८) पायचीत करून ही जोडी फोडली. मग मॅथ्यू वेडनेही (१९) निराशा केली. परंतु स्मिथने जॅक लीचला लाँगऑनला षटकार खेचून अर्धशतक नोंदवले. शतकाकडे कूच करणाऱ्या स्मिथला ख्रिस वोक्सने ८० धावांवर पायचीत केले. या धक्क्यानंतर पीटर सीडल (१८) आणि नॅथन लायन (२५) जोडीने नवव्या गडय़ासाठी ३७ धावांची भागीदारी करून संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. आर्चरने या दोघांनाही तंबूची वाट दाखवली.

तत्पूर्वी, इंग्लंडला पहिल्या डावाच्या धावसंख्येत दुसऱ्या दिवशी फक्त २३ धावांची भर घालता आली.

 

संक्षिप्त धावफलक

’इंग्लंड (पहिला डाव) : ८७.१ षटकांत सर्व बाद २९४ (जोस बटलर ७०, जो रूट ५७; मिचेल मार्श ५/४६, पॅट कमिन्स ३/८४)

’ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ६८.५ षटकांत सर्व बाद २२५ (स्टीव्ह स्मिथ ८०, मार्नस लॅबूशेन ४८; जोफ्रा आर्चर ६/६२)

’इंग्लंड (दुसरा डाव) : ४ षटकांत बिनबाद ९ (रॉरी बर्न्‍स खेळत आहे ४, जो डेन्ली खेळत आहे १)