भारतीय संघाच्या फिरकीची धुरा समर्थपणे वाहणाऱया रविचंद्रन अश्विन याने यंदाच्या वर्षात आपल्या फिरकीच्या जोरावर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाने सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम येथील कसोटी सामना तब्बल २४६ धावांनी जिंकला. अश्विनने या सामन्यात दोनही डावांत मिळून ८ विकेट्स घेतल्या. याशिवाय, अर्धशतकी खेळी देखील साकारली. अश्विनने २०१६ या वर्षात आतापर्यंत एकूण ८० विकेट्स घेतल्या असून यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱया यादीत अश्विन अव्वल स्थानावर आहे. यातील ५५ विकेट्स अश्विनने कसोटी सामन्यांत घेतल्या आहेत.

भारतीय संघाच्या विजयात अश्विनचा वेळोवेळी मोठा वाटा राहीला आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील अश्विनच्या फिरकीचा धसका घेतात. अनेकदा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज अश्विनच्या फिरकीचा सामना करण्यासाठीच्या उद्देशाने नेट्समध्ये सराव देखील करतात. अश्विनने आपल्या फिरकीसोबतच गोलंदाजीतील वैविध्यतेने सर्वांची मने जिंकली आहेत. अश्विनच्या नावावर आजवर अनेक विक्रमांची नोंद आहे. अश्विनने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये आतापर्यंत ४१ कसोटी सामन्यांत २३१, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०२ सामन्यांत १४२ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय ट्वेन्टी-२० विश्वात अश्विनच्या खात्यात ५२ विकेट्स जमा आहेत. ५ जून २०१० रोजी अश्विनने भारतीय संघात पदार्पण केले होते. गेल्या सहा वर्षांत अश्विनच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला असून अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धेत अश्विनने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.