अफगाणिस्तानने सोमवारी खेळल्या गेलेल्या आशिया चषकातील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय मिळवला. ‘ब’ गटात खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ९१ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे श्रीलंकेचा आशिया चषकातील प्रवास संपुष्टात आला आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच श्रीलंकेचा पराभव केला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या अफगाणिस्तानने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४९ धावा केल्या. त्यांच्याकडून मोहम्मद शहजाद (३४), इंसानुल्लाह जनात (४५), रहमत शाह (७२) आणि हश्मतुल्लाह शाहिदी (३७) यांनी चांगली खेळी केली. अफगाणिस्तानच्या एकावेळी ३ विकेटवर १९० धावा होत्या. त्यानंतर श्रीलंकेने पुनरागमन केले. वेगाने धावा बनवण्याचा नादात अफगाणिस्तानचे अखरेचे खेळाडू बाद झाले. परंतु, श्रीलंकेच्या संपूर्ण संघाला ४१.२ षटकांत १५८ धावाच काढता आल्या. या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा अफगाणिस्तानचा खेळाडू रहमत शाहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. शाहने ९० चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ७२ धावांची शानदार खेळी केली.  तिसारा परेराने आपल्या वनडे कारकीर्दीत चौथ्यांदा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याचा कारनामा केला आहे.

अफगाणिस्तानचे २४९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकन संघाची सुरूवात निराशाजनक ठरली. पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मुजीब-उर-रहमानने श्रीलंकेच्या कुसल मेडिंसचा बळी टिपला. मेंडिस पायचीत बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर १४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा दुसरा गडी बाद झाला. दुसऱ्या गड्यासाठी थरंगा आणि डिसिल्वा यांच्यात ५४ धावांची भागीदारी झाली. पण त्यांना विजयी लक्ष्य गाठता आले नाही. त्यांचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. अफगाणिस्तानने श्रीलंकेवर मात करत सर्वांनाच धक्का दिला आहे.