१५ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणाऱ्या आशिया चषकाच्या आयोजनात महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. भारतीय संघ आणि स्पर्धेत सहभागी होणारे इतर ५ संघ हे वेगळ्या हॉटेलमध्ये राहणार असल्याचं समजतंय. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुबईत ग्रँड हयात या हॉटेलमध्ये तर इतर संघ हे इंटरकॉन्टिनेंटल या हॉटेलमध्ये राहणार आहेत. बीसीसीआयच्या दबावामुळे आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क हे पाकिस्तानऐवजी युएईला दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार स्पर्धेचं ठिकाण बदलण्यात आलेलं असलं तरीही भारतीय संघाला यजमान संघाला मिळणारे फायदे व सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.

याचसोबत बदललेल्या वेळापत्रकानुसार भारत आपले सर्व सामने हे दुबईत खेळणार असल्याचं समजतंय. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडीयम आणि अबु धाबी येथील शेख झायद मैदानावर आशिया चषकाचे सामने रंगणार आहेत. या स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवल्यास भारताला सर्व सामने दुबईतच खेळावे लागणार आहेत. या स्पर्धेसाठी भारताचा अ गटात समावेश करण्यात आला असून भारतासोबत हाँग काँग आणि पाकिस्तान या दोन संघाचा समावेश करण्यात आलेला आहे. १८ सप्टेंबरला भारत हाँग काँगविरुद्ध पहिला सामना खेळणार असून, १९ तारखेला भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान असणार आहे.