आशिया कपसाठी संयुक्त अरब अमिरातमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी मैदानात सराव केला. सरावादरम्यान पाकिस्तान संघही तिथे पोहोचला आणि मैदानातील कट्टर प्रतिस्पर्ध्यांचे मैदानाबाहेरील मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. धोनीला पाहताच मलिक थेट त्याच्या दिशेने चालत गेला आणि हस्तांदोलन केले. यानंतर काही वेळ दोघांमध्ये चर्चा देखील झाली.

आशिया कपसाठी भारत, पाकिस्तान, श्रीलंका व अन्य देशांचे संघ यूएईत पोहोचले आहे. शुक्रवारी संध्याकाळी आशिया कपमध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांच्या कर्णधारांनी पत्रकार परिषदही घेतली. पत्रकार परिषदेपूर्वी भारतीय संघाने मैदानात कसून सराव केला. याच दरम्यान पाकिस्तान संघही तिथे सरावासाठी पोहोचला.

पाकिस्तानचे खेळाडू मैदानात येत होते. मैदानात येताच शोएब मलिकने महेंद्रसिंह धोनीला पाहिले. यानंतर तो धोनीला भेटण्यासाठी भारतीय संघ सराव करत होता तिथे पोहोचला. त्याने धोनीशी हस्तांदोलन केले. यानंतर काही वेळ दोघांमध्येही चर्चा झाली. यादरम्यान रोहित शर्मा व अन्य खेळाडूही तिथे उपस्थित होते. शोएबने त्यांच्याशी देखील बोलत असल्याचे व्हिडिओत दिसते.

दरम्यान, भारत व पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी तब्बल १५ महिन्यानंतर आमने-सामने उभे ठाकणार आहेत. १९ सप्टेंबर रोजी हा सामना रंगणार असून या सामन्याकडे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.