अ‍ॅथलेटिक्समधील दुसरा खेळाडू स्पर्धेबाहेर

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाला धक्का बसला आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेस धावपटू नवीन डागरने उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे.

२०१४ मध्ये इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत डागरने कांस्यपदक जिंकले होते. आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत डागरने ८:४१ सेकंद अशी पात्रता वेळ गाठली होती. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडून डागरवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र २३ जुलैला त्याला देण्यात आले आहे. आंतरराज्य स्पर्धेत त्याने मेल्डोनियम या बंदी असलेल्या उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) घेतलेल्या चाचणीत सिद्ध झाले आहे.

‘‘डागर भूतान येथे मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंसोबत विशेष सराव शिबिरात सहभागी झाला होता. मेल्डोनियम पदार्थाचे सेवन करणाऱ्या डागरच्या ‘ब’ नमुन्याच्या अहवालाची आता प्रतीक्षा आहे,’’ अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या आठवडय़ात उत्तेजकांचे सेवन केल्याप्रकरणी दुसरा अ‍ॅथलेटिक्सपटू दोषी सापडल्यामुळे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघापुढील चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी भालाफेकपटू अमित कुमारने उत्तेजकांचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे. डागरवरील उत्तेजकाचे सावट दूर झाले नाही तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताचा सहभाग नसेल.