अमान (जॉर्डन) : आशियाई रौप्यपदक विजेत्या आशीष कुमार (७५ किलो) याने चौथ्या मानांकित ओम्बूरेक बेकझाइट उलू याच्यावर दणदणीत विजय मिळवत आशियाई ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

एकतर्फी झालेल्या या लढतीत आशीषने किर्गिझिस्तानच्या बेकझाइटचे आव्हान ५-० असे सहज मोडीत काढले. आता उपांत्यपूर्व फेरीत आशीषला इंडोनेशियाच्या मायखेल रॉबेर्ड मस्किटा याच्याशी लढत द्यावी लागेल. मस्किटाने न्यूझीलंडच्या रायन स्कायफे याच्यावर मात करत आगेकूच केली. उपांत्य फेरीत मजल मारल्यास आशीषचे टोक्यो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित होईल.

आपल्यापेक्षा तगडा प्रतिस्पर्धी असलेल्या बेकझाइटविरुद्ध आशीषने सुरुवातीला सावध पवित्रा अवलंबला. बेकझाइटपासून दूर राहत आशीषने प्रतिस्पध्र्याला पंचेस लगावण्यास परावृत्त केले. बेकझाइटचे पंचेस चुकवत आशीषने मात्र पहिल्या फेरीत अचूक फटके लगावले. दुसऱ्या फेरीत बेकझाइटने आशीषवर दडपण आणले. मात्र उजव्या हाताने ठोशांची सरबत्ती करत आशीषने त्याची परतफेड केली. अंतिम फेरीत आशीषच्या ताकदवान ठोशांपुढे बेकझाइट निष्प्रभ ठरला. त्यामुळे सर्व पंचांनी आशीषच्या बाजूने निकाल दिला.

ही लढत खूपच आव्हानात्मक होती, पण विजय मिळवल्याचा आनंद होत आहे. आता पुढील प्रतिस्पध्र्याचा सामना करण्यासाठी मी योग्य रणनीती आखली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी मी एक पाऊल दूर असूून ही लढत माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी सर्वोत्तम योगदान देणार आहे.

– आशीष कुमार