|| मुकुंद धस

अंतिम सामन्यात कझाकस्तानवर ६८-४५ अशी मात

यजमान भारताने अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे कझाकस्तानला ६८-४५ अशी धूळ चारून बेंगळूरु येथे झालेल्या २४व्या आशियाई मुलींच्या (१८ वर्षांखालील) बास्केटबॉल स्पर्धेतील ‘ब’ विभागाचे अजिंक्यपद मिळवले. त्याशिवाय त्यांनी पुढील स्पर्धेत ‘अ’ विभागात स्थान मिळवले. गतवर्षी याच कोर्टवर यजमानांच्या महिला आणि १६ वर्षांखालील मुलींच्या संघाने ‘ब’ विभागाचे अजिंक्यपद पटकावले होते आणि आजच्या यशाने भारताने विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

भारताच्या हर्षिता आणि पुष्पाने सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारून प्रतिस्पध्र्याच्या संरक्षित क्षेत्रात मुसंडी मारत गुण नोंदवण्याचा सपाटा लावला होता. कझाकस्तानच्या खेळाडूंना चेंडूवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येत नाही हे बरोबर हेरून, यजमानांनी ‘मॅन टू मॅन’ तंत्राचा अवलंब करून त्यांना पूर्ण जेरीस आणले. सुरुवातीच्या १६-९ अशा आघाडीनंतर पुष्पाने आक्रमणाची सूत्रे आपल्या हाती घेत गुणफलक हालता ठेवला. त्याशिवाय बचावात प्रतिस्पध्र्याची अनेक आक्रमणे फोल ठरवली. मध्यंतराच्या ३२-१६ अशा मोठय़ा आघाडीनंतर हर्षिताने आपल्या उंचीचा फायदा घेत कझाकस्तानचा बचाव मोडून काढला आणि सामन्याचा निकाल स्पष्ट केला. शेवटच्या सत्रात, पायास झालेल्या दुखापतीमुळे पुष्पाला काही काळ मैदान सोडावे लागले. या संधीचा फायदा घेऊन कझाकस्तानने लागोपाठ ८ गुण नोंदवून पिछाडी थोडीफार भरून काढली. परंतु पुष्पाच्या पुनरागमनानंतर यजमानांनी सामन्यावर नियंत्रण मिळवून विजय साजरा केला. बास्केटबॉल महासंघाचे अध्यक्ष गोविंदराज यांनी विजेत्या संघाचे १० लाख रुपये देऊन कौतुक केले.

‘अ’ गटात चीन विजयी

‘अ’ विभागाच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या चीनने जपानचा ८९-७६ असा पाडाव करून सलग पाचवे तर स्पर्धेच्या इतिहासातील १६वे अजिंक्यपद पटकावले. तसेच या स्पर्धेच्या साखळी सामन्यात जपानकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली. युआन ली आणि झुओ फँग यांनी चीनच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.