आशियाई स्पर्धेतील पहिल्या दिवसाचा अपवाद वगळता भारताचा सुवर्णपदकांचा दुष्काळ अद्याप संपलेला नाही. भारतीय तिरंदाजांनी सहाव्या दिवशी रौप्यपदक तर स्क्वॉशपटूंनी दोन कांस्यपदके निश्चित केली. भारताच्या खात्यात गुरुवारी तिरंदाजांनी दोन आणि नेमबाजांनी एका कांस्यपदकाची भर घातली. भारतीय पुरुष हॉकी संघाला मात्र पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. नौकानयनपटू स्वर्ण सिंग वर्क याने एकेरी स्कल प्रकारात आणि पुरुष नौकानयनपटूंनी सांघिक प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. त्यामुळे भारतासाठी गुरुवारचा दिवस ‘इतिसी हसी, इतिसी खुशी..’ असाच ठरला.
दुहेरी कांस्यपदकांची कमाई
स्वर्णसिंग वर्क आणि सांघिक अष्टक प्रकारात यश
नौकानयन
भारताने नौकानयन (रोईंग) क्रीडा प्रकारात अखेरच्या दिवशी आणखी दोन कांस्यपदकांची भर घातली. आशियाई क्रीडा स्पध्रेत यंदा भारताला नौकानयनपटूंनी एकंदर तीन कांस्यपदकांची कमाई करून दिली. २०१०च्या आशियाई स्पध्रेत भारताच्या खात्यावर एक सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य अशी पाच पदके होती. परंतु यावेळी दर्जा आणि संख्या या दोन्ही बाबतीत भारताची कामगिरी खालावली. गुरुवारी सेनादलाच्या स्वर्णसिंग वर्कने एकेरी स्कल्स प्रकारात आणि पुरुषांच्या संघाने अष्टक प्रकारात कांस्यपदक जिंकले.
चुंगजू तेंगुम आंतरराष्ट्रीय नौकानयन केंद्रावर झालेल्या या स्पध्रेत सिख रेजिमेंटमध्ये नायक सुभेदारपदावर कार्यरत असलेल्या स्वर्णसिंगने पदक मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. २००० मीटर अंतराच्या शर्यतीत त्याने तिसरा क्रमांक पटकावताना ७ मिनिटे आणि १०.६५ सेकंद अशी वेळ नोंदवली. दोन वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये स्वर्णने नोंदवलेल्या ७ मि. २९.६६ से. या वेळेपेक्षा ही कामगिरी लक्षवेधक होती. अखेरचे अंतर कापताना २४ वर्षीय माजी व्हॉलीबॉलपटू स्वर्णसिंगला दक्षिण कोरियाच्या रौप्यपदक विजेत्या किम डाँगयाँगचे आव्हान होते. विजयरेषा पार केल्यानंतर थकव्यामुळे स्वर्णसिंग बोटमधून पाण्यात कोसळला. मग बचावपथकाने त्याला बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.
भारतीय नौकानयन महासंघाचे सरचिटणीस एम. व्ही. श्रीराम यांनी सांगितले की, ‘‘स्वर्णसिंगची प्रकृती आता ठीक आहे. नौकानयनपटूंना अशा प्रकारे थकवा येतो. गेले काही महिने त्याला पाठदुखीने त्रस्त केले आहे. परंतु त्यावर मात करून त्याने हिमतीने पदक जिंकले आहे.’’
त्यानंतर अष्टक प्रकारात कपिल शर्मा, रणजीत सिंग, बजरंग लाल ठाकर, पी. यू. रॉबिन, के. सावन कुमार, मोहम्मद आझाद, मणिंदरसिंग, देविंदरसिंग आणि मोहम्मद अहमद यांच्या चमूने भारताला कांस्यपदक जिंकून दिले. चीनला सुवर्ण आणि जपानला रौप्यपदक मिळाले. या स्पध्रेच्या अध्र्या अंतरापर्यंत भारतीय संघ चौथ्या स्थानावर होता, परंतु अखेरच्या अंतरात भारताने अतिरिक्त प्रयत्न करून तिसरा क्रमांक मिळवला.
महिलांच्या क्वाड्रपल स्कल्स प्रकारात अमनजोत कौर, संजुक्ता डंग डंग, एन. लक्ष्मीदेवी आणि नवनीत कौर यांना आठवा क्रमांक मिळाला. याचप्रमाणे पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारात ओम प्रकाश आणि दत्तू बबन भोकनलाल या जोडीला पाचवा क्रमांक मिळाला.
तिरंदाजांचे रौप्य निश्चित
तिरंदाजी
भारताच्या तिरंदाजांनी सुरेख कामगिरी करत १७व्या आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात रौप्यपदक निश्चित केले आहे. अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि संदीप कुमार यांच्या भारतीय संघाने उपांत्य फेरीत इस्माइल ईबादी, माजित घेईदी आणि आमीर काझेम्पोर यांच्या इराण संघाचा २३१-२२७ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय पुरुष संघाने गुरुवारी सकाळी अंतिम १६ जणांच्या सामन्यात कतारचा २३३-२१८ असा धुव्वा उडवला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाला २३४-२२९ असे हरवले. भारतीय पुरुषांचा अंतिम सामना यजमान कोरियाशी होणार आहे. भारतीय महिलांना मात्र कंपाऊंड सांघिक प्रकारात जेतेपदासाठी दावेदार समजल्या जाणाऱ्या चीनकडून उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्रिशा देब, पुर्वशा शेंडे आणि ज्योती सुलेख वेन्नाम यांच्या भारतीय संघाला तैवानकडून २२४-२२६ असा पराभव पत्करावा लागला.
महिला नेमबाजांनी पत राखली
नेमबाजी
हमखास पदक मिळवून देण्याची खात्री असलेल्या नेमबाजी या खेळात सलग दुसऱ्या दिवशी ‘पाटी कोरी’ राहण्याची शक्यता निर्माण झाली असताना महिला नेमबाजांनी मात्र भारताची पत राखली. शगुन चौधरी, श्रेयसी सिंग आणि वर्षां वर्मन यांच्या महिला संघाने डबल ट्रॅप प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घालत भारताला नेमबाजीतील सातवे पदक मिळवून दिले. पिस्तूल आणि रायफल प्रकारात भारतीय नेमबाजांनी साफ निराशा केली.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात गगन नारंग सपेशल अपयशी ठरला. पिस्तूल नेमबाज गुरप्रीत सिंग, महावीर सिंग आणि समरेश जंग यांनीही निराशा केली. मात्र डबल ट्रॅप प्रकारात भारतीय महिलांना भारताला गुरुवारच्या दिवसातील एकमेव पदक मिळवून दिले. शगुन हिने १२०पैकी ९६ गुणांची कमाई करत आठवे स्थान पटकावले. श्रेयसी हिने ९४ गुणांसह १०व्या स्थानावर मजल मारली. वर्षांने ८९ गुण मिळवले. तिघींचे एकत्रित गुण २७९ इतके झाले. त्यामुळे भारताला कांस्यपदकापर्यंत मजल मारता आली. चीनने सुवर्ण तर कोरियाने रौप्यपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या गगन नारंगला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ५० मीटर रायफल प्रोन प्रकाराच्या पात्रता फेरीत त्याने ६१८.४ गुणांसह १४वे स्थान पटकावले. जॉयदीप कर्माकरने नारंगपेक्षा सरस कामगिरी करत ६२१.२ गुणांसह १०वे तर हरिओम सिंगने ६१३.२ गुणांसह २९वे स्थान प्राप्त केले. सांघिक प्रकारात मात्र भारताला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात गुरप्रीत सिंगने ५७० गुणांसह पाचवे तर महावीर सिंगने ५५९ गुणांसह १७वे आणि समरेश जंगने ५५५ गुणांसह २४वे स्थान पटकावले. त्यामुळे भारताची पाचव्या स्थानावर घसरण झाली. पुरुषांच्या सांघिक डबल ट्रॅप प्रकारात अंकुर मित्तल, संग्राम दहिया आणि अशाब मोहम्मद यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या या संघाने ३९८ गुण मिळवले.
आणखी दोन पदकांची निश्चिती
भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत दाखल
स्क्वॉश
भारताच्या पुरुष आणि महिला संघाने गुरुवारी उपांत्य फेरी गाठून किमान कांस्यपदकाची निश्चिती केली आहे. त्यामुळे भारतीय स्क्वॉशपटू शानदार कामगिरीनिशी आशियाई क्रीडा स्पध्रेतील चारही गटांमध्ये पदके जिंकण्याचा पराक्रम यंदा दाखवू शकणार आहेत.
२०१०च्या गुआंगझाऊ आशियाई क्रीडा स्पध्रेत स्क्वॉश क्रीडा प्रकारात भारताने तीन कांस्यपदके पटकावली होती. परंतु इन्चॉनमध्ये सौरव घोषालने रौप्य आणि दीपिकाने कांस्यपदक जिंकले आहे आणि आणखी दोन पदके दृष्टीपथात आहेत.
येओरूमल स्क्वॉश कोर्टवर दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पाचा समावेश असलेल्या भारताच्या महिला संघाने ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळवताना चीनला ३-० अशी धूळ चारली. भारतीय महिलांची उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाशी लढत होईल.
महिलांच्या लढतीत जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानावर असलेल्या चिनप्पाने २२ मिनिटांत जिन्यू गूचा ११-५, ११-७, ११-८ असा पराभव केला. मग अनाका अलंकामोनीने चेन शूचा १२-१०, ११-७, ११-८ असा पराभव केला. मग पल्लीकलने डाँगजि लि हिला ६-११, ११-६, ११-६, ११-५ असे हरवले.
पुरुषांच्या गटात भारताने जपानला ३-० असे हरवले, परंतु अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी १-२ अशी हार पत्करली. त्यामुळे त्यांना गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
घोषालशिवाय उतरलेल्या भारतीय संघाला अखेरच्या लढतीत तीन पैकी फक्त एक सामना जिंकता आला. हरिंदर पाल संधू आणि कुश कुमार यांनी पराभव पत्करल्यानंतर महेश माणगावकरने ओंग बेंग ही याला ११-९, ११-३, ११-१ असे पराभूत केले.