इंडोनेशियामध्ये सोमवारी सांगता झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तब्बल ६९ पदकांच्या ऐतिहासिक कामगिरीसह देशाला आठव्या स्थानावर नेऊन ठेवले. विविध खेळांमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंनी भारतीय क्रीडाविश्वाला नवसंजीवनी देण्याचे काम यंदाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केले आहे. राष्ट्रकुलनंतरच्या या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीने भारताने अजून एक मोठे उड्डाण केले आहे.

जकार्ता आणि पालेमबंगमध्ये पार पडलेल्या या स्पर्धामध्ये भारताला यंदा सर्वाधिक मोठे यश हे अ‍ॅथलेटिक्समध्ये प्राप्त झाले. या क्रीडा प्रकारात भारताने तब्बल १९ पदके पटकावत भारताला पदकतालिकेत पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली. भारताने आतापर्यंतच्या आशियाई क्रीडा इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी नोंदवली आहे. ऑलिम्पिकपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताने इतके घवघवीत यश मिळवल्याने क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे. केवळ क्रिकेट या एकाच खेळाभोवती वर्षांनुवर्षे रुंजी घालणाऱ्या या देशात अन्य खेळांनादेखील महत्त्व प्राप्त होण्याची संधी या धवल कामगिरीमुळे निर्माण झाली आहे. भारताकडून तेजिंदरपाल सिंग तूरने अ‍ॅथलेटिक्समध्ये पहिले पदक जिंकून विजयी अभियानाला प्रारंभ करून दिला. त्याशिवाय स्वप्ना बर्मनने हेप्टॅथलॉन प्रकारात भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी करून दाखवली. त्याशिवाय आशियाईचा ध्वजधारक बनलेल्या नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवून त्याच्यावर दाखवला गेलेला विश्वास सार्थ ठरवला. भारताला नेमबाजीत राही सरनोबतने मिळवून दिलेले सुवर्णदेखील अन्य नेमबाजांसाठी प्रेरणादायी ठरले. तसेच बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या मल्लांनी पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक मिळवून देत भारताचे स्थान भक्कम करण्यात योगदान दिले. पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवालने सुवर्णपदकाची अपेक्षा पूर्ण केली नसली तरी रौप्य आणि कांस्यपदक पटकावून काहीसा दिला दिला. अखेरच्या टप्प्यात बर्धन आणि शिवनाथ सरकार यांनी ब्रिजमध्ये तसेच अमित पानघलमध्ये सुवर्णमय कामगिरी करीत भारताला आठव्या स्थानापर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका निभावली.

कबड्डी, हॉकीमध्ये अपेक्षाभंग

यंदाच्या आशियाई स्पर्धेत नवनवीन प्रकारांमध्ये भारताने पदकांची लयलूट केली असताना वर्षांनुवर्षे ज्या खेळांमध्ये भारताची मक्तेदारी होती, त्या खेळांमध्ये मात्र भारताला सुवर्ण मिळाले नसल्याची खंत निश्चितच आहे. कबड्डी खेळात सातत्याने सात वेळा सुवर्णपदक जिंकलेल्या भारताला कबड्डीमध्ये तसेच हॉकीसारख्या वर्चस्व असलेल्या खेळात सुवर्णपदक मिळू न शकल्याची खंत नक्कीच भारतीय खेळाडूंच्या मनात राहणार आहे.

१५ ते ६० वर्षांचे पदकविजेते

यंदाच्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या अवघ्या १५ वर्षांच्या सौरभ चौधरीने तसेच ६० वर्षांच्या प्रणब बर्धन यांनीदेखील पदक जिंकून अनोख्या कामगिरीचा प्रारंभ केला आहे. त्यामुळे भारताच्या विजयात नवयुवकांइतकाच ज्येष्ठ नागरिकाचादेखील मोलाचा सहभाग घडून आला. त्यामुळे या विक्रमी कामगिरीत प्रत्येक वयोगटातील खेळाडूचा हातभार लागला.

१५ सुवर्णाच्या विक्रमाची बरोबरी

आशियाई क्रीडा स्पर्धेला १९५१ साली प्रारंभ होतानाच्या स्पर्धेतच भारताने १५ सुवर्णपदके जिंकली होती. त्यानंतर म्हणजे तब्बल ६७ वर्षांनंतर भारताला त्या विक्रमाची बरोबरी साधणे यंदा शक्य झाले आहे. गत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ६५ पदके मिळवली होती. त्यापेक्षादेखील चार जास्तीची पदके भारताने यंदा मिळवून दाखवली आहेत.