इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये भारताच्या अॅथलिट्सनी पकदांची लयलूट केली आहे. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी भारताला ४ * ४०० रिले प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताचा मोहम्मद अनस, पुवाम्मा, हिमा दास, अरोकिया राजीव या चमूने ३:१५:७१ अशी वेळ नोंदवत रौप्यपदकाची कमाई केली. बहारिनच्या चमुला या प्रकारात सुवर्णपदक मिळालं. मात्र या निर्णयाला भारतीय पथकाने आव्हान दिलं आहे. हिमा दासच्या मार्गात बहारिनच्या खेळाडूने अडथळा आणल्यामुळे हिमाला संपूर्ण जोशानिशी पळता आलं नाही असा दावा भारतीय संघाने केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेच्या आयोजकांनीही भारताचं अपिल मान्य केलं असून, बुधवारी १० वाजता यावर निकाल येण्याची शक्यता आहे.

“बहारिनने उघडपणे हिमा दासच्या मार्गात अडथळा आणला. या प्रकारात हिमाला थोडीशी दुखापतही झाली आहे. यामुळेच हिमा शर्यतीत मागे पडली. याविरोधात आम्ही दाद मागितली असून परिक्षक यावर निर्णय घेतील.” अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी पीटीआयशी बोलत असताना ही माहिती दिली.

स्पर्धेच्या सुरुवातीला मोहम्मद अनसने आश्वासक सुरुवात करुन बहारिनच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकलं होतं. यानंतर मोहम्मदने बॅटन पुव्वामाकडे दिलं, मात्र पुवाम्माला मोहम्मद अनासने घेतलेली आघाडी कायम राखता आली नाही. बहारिनच्या प्रतिस्पर्ध्याने पुवाम्माला मागे टाकलं, मात्र बॅटन हिमा दासकडे सोपवत असताना बहारिनची धावपटू ओलुवाकेमी आदेकोया हिमा दासच्या मार्गात पडली. याचा फायदा घेत दुसरी बहारिन धावपटू सालवा नासेरने बॅटन घेत पळायला सुरुवात केली. या प्रकारात भारताची हिमा दास मागे पडली. “मी बहारिनच्या खेळाडूवरुन उडी मारत धावायला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी मी चुकीच्या लेनमधून धावत असल्याचा समज झाल्यामुळे मी पुरती गोंधळून गेले होते. ती माझ्यासमोर जाणूनबुजून पडली की नाही हे मी सांगू शकत नाही, मात्र या प्रकारात पुढच्या वेळी आम्ही अधिक मेहनत करुन नक्की सुवर्णपदक मिळवू.” हिमा दासने आपलं मत मांडलं. त्यामुळे या प्रकरणावर नेमका कोणाच्या बाजूने निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.