पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलात तीन दिवस रंगणाऱ्या स्पर्धेचा शानदार शुभारंभ

मणिपूरच्या दिनेश सिंगने आशियाई कनिष्ठ शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले, तर आंध्र प्रदेशच्या एन. रवीकुमारने त्याच गटात कांस्यपदक पटकावले.

पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलात सुरू झालेल्या ५२ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेमधील ७५ किलो वजनी गटात भारताकडून दिनेश सिंगने चमक दाखवली. या गटात व्हिएतनामच्या ली गिआ हुए याने रौप्यपदक पटकावले. गतवर्षी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये दिनेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या स्पर्धेतील विजेतेपद पटकावल्यानंतर हे पदक संपूर्ण देशाला समर्पित करीत असल्याचे त्याने सांगितले. इम्फाळमधील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या दिनेश सिंगला या विजेतेपदानंतर अतोनात आनंद झाला. त्याने त्याच्या विजयाचे श्रेय गुरू आणि मार्गदर्शक के. प्रदीपकुमार सिंग यांना दिले आहे.

भारतासाठी ७५ किलोवरील गटातील निकाल निराशाजनक ठरला. ठोकचोम ग्यानेंद्र आणि एल. हेनारी सरमा यांना अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

त्यात इराणच्या हमीद अहमदीने सुवर्ण, उझबेकिस्तानच्या व्लादिमीर वॅलिनकिनने रौप्य तर इराकच्या अहमद अली हुसेनने कांस्यपदक पटकावले. ४० ते ४९ वयोगटातील मास्टर्स गटातदेखील भारताच्या हाती निराशा आली. तर ५० ते ६० या मास्टर्स गटात भारताच्या संजय आंबेरकर यांना रौप्य तर एस. श्रीनिवासन यांना कांस्यपदक मिळाले. या गटात चीनच्या क्यू गुइक्विअन याने सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे मास्टर्स गटात भारत चमकला.