विनेश फोगट, अंशू मलिक, गुरशरण प्रीत कौर यांना कांस्यपदके

नवी दिल्ली : भारतीय महिलांनी आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पदकांची लयलूट कायम राखताना शुक्रवारी एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण चार पदके कमावली. अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी रुयकेकडून पराभूत झाल्यामुळे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर विनेश फोगट, अंशू मलिक आणि गुरशरण प्रीत कौर यांनी कांस्यपदके पटकावली.

६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताला साक्षीकडून सुवर्णपदकाच्या आशा होत्या. परंतु नाओमीने सुरुवातीने मिळवलेली दोन गुणांची आघाडी कायम राखत अखेरीस साक्षीला २-० असे नमवले.

कांस्यपदकाच्या लढतीत विनेशने ५३ किलो वजनी गटात व्हिएतनामच्या थि लाय किएयूला १०-० असे नामोहरम केले. याचप्रमाणे ५७ किलो गटात अंशूने उझबेकिस्तानच्या सेव्हारा ईशमुरोतोव्हाचा ४-१ असा पराभव केला. ७२ किलो गटात गुरशरणने मोंगोलियाच्या त्सेव्हेगमेड इन्खबायारवर ५-२ असा विजय मिळवला. ६२ किलो गटात सोनम मलिकाने निराशा केली. विश्वविजेत्या ऐसुलू टायनायबेकोव्हाने सोनमचा ११-० असा वर्चस्वपूर्ण पराभव केला.

महिलांना आठ पदके

गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या खात्यावर आता चार सुवर्ण, दोन रौप्य आणि सात कांस्य अशी एकूण १३ पदके जमा आहेत. यापैकी भारतीय महिलांनी तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण आठ पदके मिळवली आहे. गतवर्षी भारतीय महिलांनी फक्त चार कांस्यपदके प्राप्त केली होती. ही संख्या यंदा दुप्पट केली आहे. १० महिला खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.