सरावप्रारंभासाठी खेळाडूंच्या प्रतिक्रियांचा महापूर

नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सराव शिबिराला कसा प्रारंभ करायचा, यासाठी खेळाडूंनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे (आयओए) प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. मात्र प्रतिक्रिया पाठवण्याची अंतिम मुदत उलटली तरी बहुतेक राष्ट्रीय क्रीडा संघटना मात्र उदासीन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टाळेबंदीदरम्यान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडूनच सरावाला कसा प्रारंभ करता येईल, याविषयी ‘आयओए’ने मते मागवली होती. सध्या ४० राष्ट्रीय क्रीडा संघटनांपैकी ३५ संघटना ‘आयओए’शी संलग्न आहेत. त्यापैकी २० संघटनांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या होत्या. पण तिरंदाजी, हॉकी, रोइंग, स्क्वॉश, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग आणि यॉटिंग या सात संघटनांचा अपवाद वगळता कोणत्याही संघटनेने अंतिम मुदतीआधी आपली प्रतिक्रिया पाठवली नाही.

खेळाडूंसाठी ‘साइ’ची सराव मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली : रिले शर्यतींमध्ये बॅटनची आदानप्रदान नाही, बॉक्सर्सना रिंगमध्ये जाण्यास मज्जाव तसेच बंदिस्त बॅडमिंटन कोर्टमध्ये फक्त एकेरीतील खेळाडूंनाच सराव करण्याची अनुमती, अशी मार्गदर्शक तत्त्वे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) खेळाडूंच्या सरावासाठी आखली आहेत. अ‍ॅथलेटिक्स, हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि नेमबाजी या खेळातील खेळाडूंना टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर स्टेडियममध्ये सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुरक्षा नियमांचे पालन करत वेटलिफ्टिंग, तिरंदाजी, सायकलिंग, तलवारबाजी, कुस्ती आणि टेबल टेनिसपटूंनाही सराव करता येऊ शकतो, असे ‘साइ’ने म्हटले आहे.

ऑलिम्पिक खेळांबाबतीत आपण गंभीर नाहीत, याचे आश्चर्य वाटत आहे. २० मेपर्यंत अनेक संघटनांनी आपल्या प्रतिक्रियाच पाठवल्या नाहीत, हे खेदजनक आहे. त्यामुळे ३० मेपर्यंत गांभीर्य ओळखून आपल्या प्रतिक्रिया पाठवाव्यात, असे बाकीच्या संघटनांना सांगण्यात आले आहे.

-नरिंदर बात्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन चे अध्यक्ष