टोक्यो : करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर अद्याप तरी जपानमधील आणि अन्य देशांच्या क्रीडापटूंनी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेतून माघारीचे निर्णय घेतलेले नाहीत. त्याऐवजी या खेळाडूंनी ‘थांबा आणि वाट पाहा’ ही भूमिका स्वीकारली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला दोन महिने बाकी आहेत, परंतु जपानमधील बऱ्याचशा राज्यांत तिसऱ्या टप्प्यातील आणीबाणी सुरू आहे. मात्र ऑलिम्पिक स्पर्धा रद्द न करण्याबाबत संयोजक ठाम आहेत. एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या या ऑलिम्पिकमध्ये स्वयंसेवक आणि प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. स्पर्धेतून माघार घेण्यासंदर्भात आतापर्यंत फक्त उत्तर कोरियाने मतप्रदर्शन केले आहे.

देशातील करोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीबाबत जपानचे आघाडीचे टेनिसपटू नाओमी  ओसाका आणि केई निशिकोरी यांनी चिंता प्रकट केली आहे. ‘‘ऑलिम्पिक व्हावे, ही माझी इच्छा आहे, परंतु बरेच काही त्यासंदर्भात घडते आहे. मी फक्त एक क्रीडापटू आहे आणि अद्यापही करोनाची साथ सुरू आहे,’’ असे ओसाकाने म्हटले होते. आपले लसीकरण झाल्याचेही तिने सांगितले.

२०१६च्या ऑलिम्पिकमध्ये झिका विषाणू संसर्गाच्या साथीमुळे जपानचा नामांकित गोल्फपटू हिडेकी मात्सुयामाने माघार घेतली होती. ‘‘जपानमधील सद्य:स्थिती योग्य नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास ऑलिम्पिक रद्द करणेच शहाणपणाचे ठरेल. मला अद्यापही लशीची पहिली मात्रा मिळालेली नाही,’’ असे मात्सुयामाने म्हटले आहे.

मातब्बर टेनिसपटू राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांनी अद्यापही ऑलिम्पिकबाबत निर्णय घेतलेला नाही; परंतु अमेरिकेचा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरील गोल्फपटू डस्टिन जॉन्सन, ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम स्कॉट आणि न्यूझीलंडच्या डॅनी ली यांनी ऑलिम्पिकमधून माघारीचा निर्णय घेतला आहे.

टोक्योच्या सुमो स्टेडियमवर लसीकरण केंद्र

टोक्यो : टोक्योच्या सुमो स्टेडियमचे सोमवारपासून लसीकरण केंद्रात रुपांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी ६५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी लसीकरण सुविधा देण्यात आली. सुमिदा वॉर्ड परिसरातील या स्टेडियमवर ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचे सामने खेळवण्यात येणार आहेत.