एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा

गतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्याकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे स्पेनच्या राफेल नदालचे एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र तरीही नदालचे एटीपी क्रमवारीतील अग्रस्थान अबाधित राहणार आहे.

राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आंद्रे आगासी या गटातून स्टेफानोस त्सित्सिपासने पहिले, तर झ्वेरेव्हने दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरीत मजल मारली. नदालला तिसऱ्या तर डॅनिल मेदवेदेव याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.दुसरीकडे बियाँ बोर्ग गटातून डॉमिनिक थिएमने दोन सामने जिंकून अव्वल, तर रॉजर फेडररने दुसरे स्थान प्राप्त केले. दोन पराभवांमुळे नोव्हाक जोकोव्हिच आणि मॅट्टेओ बेरेट्टिनी यांचे आव्हान संपुष्टात आले. आता त्सित्सिपास वि. फेडरर आणि थिएम वि. झ्वेरेव्ह अशा उपांत्य फेरीच्या लढती होतील.

उपांत्य फेरीत मजल मारता आली नसली तरी नदालने वर्षअखेरीस ९५८५ गुण मिळवत एटीपी क्रमवारीतील अग्रस्थानाचा चषक पटकावला.