ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने अ‍ॅशेस मालिकेतील खराब कामगिरीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन केले. पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावर खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वॉर्नरने दमदार त्रिशतक लगावले. पाकिस्तानच्या सगळ्याच गोलंदाजांचा वॉर्नरने समाचार घेतला. संपूर्ण मैदानात वॉर्नरने चौफेर फटकेबाजी केली आणि त्रिशतकी खेळी करत पाकिस्तानपुढे धावांचा डोंगर उभा केला.

वॉर्नरने दमदार खेळी केली आणि त्रिशतक झळकावले. त्यानंतर आईसलँड क्रिकेटने त्यांच्या क्रिकेट बोर्डाच्या ट्विटर अकाऊंटवरून पाकिस्तानच्या खेळाडूला ट्रोल केले. पाकिस्तानचा क्रिकेटपटू इमाम उल हक याला आईसलँड क्रिकेटने ट्रोल केले. पाकिस्तानच्या इमाम उल हक याने कसोटी कारकिर्दीत जेवढ्या धावा केल्या आहेत, त्यापेक्षा जास्त धावा डेव्हिड वॉर्नरने गेल्या दोन डावात केल्या आहेत, असे म्हणत आईसलँड क्रिकेटने पाकच्या इमामला ट्रोल केले.

इमामने ११ कसोटी सामन्यात मिळून आतापर्यंत ४८७ धावा केल्या आहेत. तर वॉर्नरने दोन डावात मिळून ४८९ धावा केल्या आहेत.

दरम्यान, धडाकेबाज खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचे हे कसोटी क्रिकेटमधील पहिलेच त्रिशतक ठरले. डेव्हिड वॉर्नरने ४१८ चेंडूचा सामना करताना नाबाद ३३५ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ३९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. वॉर्नरने लाबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६१ धावा, स्टिव्ह स्मिथसोबत १२१ तर मॅथ्यू वेडसोबत ९९ धावांची भागीदारी केली.

अ‍ॅडलेड कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने ५०० धावांचा टप्पा ओलांडला. पाकिस्तानचे सर्व गोलंदाज वॉर्नरसमोर अपयशी ठरले. शाहीन आफ्रिदीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं, त्याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला यश मिळालं नाही. अखेरीस ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ५८९/३ वर घोषित केला. त्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज आता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.