पाच सेट्सच्या झुंजीनंतर शापोवालोव्हवर मात; नदाल, चिलीचची आगेकूच

फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाने पराभवाच्या छायेतून सामना जिंकत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान टिकवले आहे. याचप्रमाणे माजी विजेत्या राफेल नदाल आणि मरिन चिलीचने स्पर्धेची तिसरी फेरी गाठली.

त्सोंगाने पाच सेट्सच्या झुंजीनंतर डेनिस शापोवालोव्हवर मात केली. उत्कंठापूर्ण झालेला हा सामना त्याने ३-६, ६-३, १-६, ७-६ (७-४), ७-५ असा जिंकला व तिसरी फेरी गाठली. नदालने १७व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या आशा कायम ठेवताना अर्जेटिनाच्या लिओनाडरे मेयरला ६-३, ६-४, ७-६ (७-४) असे हरवले. चिलीचने पोर्तुगालच्या जोओ सौसावर ६-१, ७-५, ६-२ असा सफाईदार विजय मिळवला. माकरेस बघदातीसला पराभवाचा धक्का बसला. रशियन खेळाडू आंद्रे रुब्लेवने त्याचा ६-४, ६-७ (५-७), ६-४, ६-२ असा पराभव केला.

आशिया खंडातील खेळाडूंनी गेल्या तीन-चार वर्षांमध्ये ग्रॅण्डस्लॅम स्पर्धामध्ये आपला ठसा उमटवला आहे. जपानच्या केई निशिकोरीकडून प्रेरणा घेत उतरलेल्या युईची सुगिताने अनुभवी खेळाडू इव्हो कालरेव्हिचला साडेचार तास झुंज दिली. अखेर कालरेव्हिचने हा सामना ७-६ (७-३), ६-७ (३-७), ७-५, ४-६, १२-१० असा जिंकला. या सामन्याद्वारे प्रेक्षकांना टेनिसचा खरा आनंद मिळाला. जपानच्याच योशिहितो निशिओकालाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला इटलीच्या आंद्रेस सेप्पीने ६-१, ६-३, ६-४ असे सहज हरवले. आणखी एका रोमहर्षक लढतीत डावखुरा खेळाडू गिलेस म्युलरने टय़ुनिशियाच्या मॅलेक जाझिरीवर ७-५, ६-४, ६-७ (५-७), ३-६, ६-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने व्हिक्टर त्रिओकीचे आव्हान ७-५, ६-४, ७-६ (७-२) असे संपुष्टात आणले.

लिओनाडरे हा तुल्यबळ व धोकादायक खेळाडू मानला जातो व त्याच्याविरुद्ध विजय मिळवणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. टायब्रेकरमध्ये सुदैवाने मला चांगले फटके मारता आले. तिसऱ्या फेरीत मजल गाठल्याचा आनंद झाला आहे. अर्थात आता जबाबदारी वाढली आहे.  – राफेल नदाल

किर्गिओसवर दंडात्मक कारवाई

प्रेक्षकांच्या दिशेने कुत्सित नजरेने पाहिल्याबद्दल व त्यांना डिवचल्याबद्दल किर्गिओसला तीन हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. पहिल्या फेरीत त्याने ब्राझीलच्या रॉजिरिओ सिल्वाला सरळ तीन सेट्समध्ये पराभूत केले. त्या वेळी त्याच्याकडून हे बेशिस्त वर्तन घडले होते. आतापर्यंत किर्गिओस याच्याखेरीज बोर्ना कोरिक (क्रोएशिया), दिएगो श्वाट्र्झमन, मॉरिशस कोपील (दोन्ही अर्जेटिना), अ‍ॅलेक्झांडर बुबलिक (कझाकिस्तान), स्टीफन कोझलोव (अमेरिका) यांच्यावर बेशिस्त वर्तनाबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वोझ्नियाकी, स्वितोलिनाची पराभवाच्या छायेतून विजयी मुसंडी

मेलबर्न : उदयोन्मुख खेळाडूंमध्ये बलाढय़ खेळाडूंना झुंजवण्याची क्षमता असते, हे ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत पुन्हा एकदा दिसून आले. कॅरोलिन वोझ्नियाकी व एलिना स्वितोलिना यांना एकेरीत अशाच अनुभवास सामोरे जावे लागले. त्यांनी निसटता विजय मिळवीत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली.

जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान असलेल्या वोझ्नियाकीने क्रोएशियाच्या याना फेटवर ३-६, ६-२, ७-५ अशी मात केली. शेवटच्या सेटमध्ये १-५ अशा पिछाडीवरून तिने दोन वेळा मॅचपॉइंट वाचवत विजयश्री खेचून आणली. तिने फोरहॅण्डच्या ताकदवान फटक्यांबरोबरच व्हॉलीजवर सुरेख नियंत्रण मिळवले होते. युक्रेनची आणखी एक खेळाडू स्वितोलिनाने चेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनियाकोवावर ४-६, ६-२, ६-१ असा विजय मिळविला. पहिला सेट गमावल्यानंतर तिने अचूक सव्‍‌र्हिस व परतीचे सुरेख फटके असा खेळ केला. तिच्यापुढे १५ वर्षीय खेळाडू मार्ता कोस्टिकचे आव्हान आहे. मार्ताने ऑलिव्हिया रोगोवस्कावर ६-३, ७-५ असा अनपेक्षित विजय नोंदवला. या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश करणारी ती सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. यापूर्वी मार्टिना हिंगिसने १९९६मध्ये ही कामगिरी केली होती.

सलामीच्या लढतीत माजी विजेत्या व्हीनस विल्यम्स्ला पराभवाचा धक्का देणाऱ्या बेलिंडा बेन्सिकने दुसऱ्या फेरीत सपशेल निराशा केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या थायलंडच्या लुकसिया कुमकुमने तिचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवला.

दुसऱ्या फेरीतील संघर्षपूर्ण लढत मी जिंकली आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही. १-५ अशी पिछाडी असताना माझे अवसान गेले होते. पराभव डोळ्यांसमोर दिसत होता. मात्र मी खेळतच राहिले. नशिबाची साथ मला लाभली. हा सेट व सामना मी कसा जिंकला, हे मला अजून उमगलेले नाही.  – कॅरोलिन वोझ्नियाकी