आठव्या विक्रमी ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅम जेतेपदाची संधी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विक्रमी आठव्यांदा जेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने कूच करताना द्वितीय मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अंतिम फेरी गाठली आहे. त्याने तृतीय मानांकित स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला ७-६, ६-४, ६-३ असे सलग तीन सेटमध्ये नमवले. कंबरेच्या दुखापतीमुळे फेडरर उपांत्य लढतीतून माघार घेणार असल्याची चर्चा असतानाही तो जिद्दीने खेळायला उतरला. विजयानंतर जोकोव्हिचनेही फेडररच्या या जिद्दीचे आवर्जून कौतुक केले.टेनिसरसिकांना फेडरर-जोकोव्हिच लढतीत अपेक्षित चुरस पाहायला मिळाली नाही. कारण फेडरर दुखापतीवर मात करीत खेळत होता. उपांत्यपूर्व फेरीत टेनिस सॅँड्रग्रेनविरुद्धच्या लढतीत पाच सेटवर झुंज दिल्याने फेडररची दुखापत बळावली होती. इतकेच नव्हे, तर वैद्यकीय तपासणीनंतर फेडररच्या विजयाची शक्यता तीन टक्केच वर्तवण्यात आली होती.

झ्वेरेव्हविरुद्ध थीमचे पारडे जड

जर्मनीचा सातवा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीत पाचवा मानांकित डॉमिनिक थीमचे पारडे जड आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत आठ लढती झाल्या आहेत. त्यात थीमने सहा विजय मिळवले आहे. थीमने उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित स्पेनच्या राफेल नदालला नमवताना सर्वोत्तम कामगिरी बजावली होती. झ्वेरेव्हने स्वित्झर्लंडच्या स्टॅनिस्लास वाविरकाचे आव्हान परतवून लावले होते.

* वेळ : दुपारी २ वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३

अर्धशतकी लढत

* जोकोव्हिच विरुद्ध फेडरर यांच्यातील ही ५०वी लढत होती.

* ५० लढतींमध्ये जोकोव्हिचचे २७ आणि फेडररचे २३ विजय

* ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅम : फेडररला सहा आणि जोकोव्हिचला सात जेतेपदे

* मागील १४ पैकी १२ ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅम जेतेपदे फेडरर-जोकोव्हिचमध्ये

रॉजर फेडरर दुखापत असतानाही खेळला, यासाठीच त्याचा मी आदर करतो. त्यामुळे तो त्याचा नेहमीचा खेळ करू शकला नाही.

नोव्हाक जोकोव्हिच

दुखापत असली तरी पराभूत होण्याच्या दृष्टीने खेळायला उतरलो नव्हतो, मात्र ज्या पद्धतीने खेळ झाला तो निश्चित योग्य नव्हता. फक्त तीन टक्केच विजयाची खात्री होती. याउलट जोकोव्हिच हा महान खेळाडू आहे, हे पुन्हा सिद्ध झाले.

रॉजर फेडरर

बोपण्णा पराभूत, भारताचे आव्हान संपुष्टात

भारताच्या रोहन बोपण्णाचा मिश्र दुहेरीत युक्रेनची सहकारी नाडिया किचेनॉकच्या साथीने उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. याबरोबरच भारताचे आव्हान संपुष्टात आले. क्रोएशियाचा निकोल मेटकिक आणि चेक प्रजासत्ताकची बाबरेरा क्रेसिकोवा या जोडीकडून बोपण्णा-किचेनॉक जोडीला ०-६, २-६ पराभव पत्करावा लागला. मंगळवारी भारताचा सर्वाधिक अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसलाही मिश्र दुहेरीत जेलेना ओस्तापेन्कोसह दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

बोलण्यासाठी शब्दच नाहीत. बार्टीला तेदेखील तिच्या घरच्या प्रेक्षकांसमोर नमवणे सोपे नव्हते. त्यातच बार्टी अव्वल मानांकित का आहे, हे तिने मला ज्या पद्धतीने झुंजवले त्यावरून सिद्ध होते. ग्रॅँडस्लॅम अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न वयाच्या पाचव्या वर्षांपासून पाहात आले आहे ते अखेर पूर्ण झाले.

सोफिया केनिन

अंतिम फेरीत बिगरमानांकित खेळाडूविरुद्ध खेळायला लागेल असे वाटले नव्हते. अर्थातच अंतिम लढत आहे त्यामुळे ती निश्चित सोपी नाही. अर्थातच मला जेतेपदाच्या दावेदारांमध्ये सुरुवातीपासून धरले नव्हते. त्याचा मला फायदाच झाला.

गार्बिन मुगुरुझा

केनिन-मुगुरुझा यांच्यात अंतिम लढत

यंदाची ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धेची अंतिम लढत शनिवारी (१ फेब्रुवारी) अमेरिकेची सोफिया केनिन आणि स्पेनची दोन ग्रॅँडस्लॅम विजेती गार्बिन मुगुरुझा यांच्यात होणार आहे. केनिनने उपांत्य लढतीत जेतेपदाची सर्वाधिक दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशले बार्टीचा ७-६, ७-५ पराभव केला. दोन्ही सेटमध्ये बार्टीला सेट जिंकण्यासाठी गुण मिळाले होते. मात्र ते वाचवत केनिनने सामना खेचून आणला हे वैशिष्टय़ आहे. याउलट २०१६ मध्ये फ्रेंच ग्रॅँडस्लॅम आणि २०१७ मध्ये विम्बल्डन ग्रॅँडस्लॅम जिंकणाऱ्या मुरुगुझाला यंदा बिगरमानांकन मिळाले होते. जेतेपदांच्या दावेदारांमध्येही तिचे नाव नव्हते. मात्र तरीदेखील माजी अव्वल मानांकित मुरुगुझाने उपांत्य लढतीत चौथी मानांकित रोमानियाच्या सिमोना हॅलेपला ७-६, ७-५ पराभवाचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे.

सेरेना आणि गॉफपुढे केनिन दुर्लक्षित

२३ ग्रॅँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स आणि तिची उत्तराधिकारी मानण्यात येणारी १५ वर्षीय कोको गॉफ यांच्यासारखी केनिनला प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र तरीदेखील याच केनिनने चौथ्या फेरीत गॉफचा पराभव करत बाजी मारली होती. २०१९ या वर्षांत केनिनने महिला जागतिक स्पर्धेची (डब्ल्यूटीए) तीन जेतेपदे पटकावली होती.

मुरुगुझाचा खडतर प्रवास

अंतिम फेरी गाठणे मुरुगुझासाठी निश्चित सोपे नाही. २०१९ हे संपूर्ण वर्ष तिच्यासाठी अपयशी ठरले. ३६व्या क्रमवारीवर तिची घसरण झाली. इतकेच नाही तर २०१४ नंतर प्रथमच बिगरमानांकित म्हणून ग्रॅँडस्लॅममध्ये खेळण्याची वेळ तिच्यावर आली. यंदादेखील पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून आलेल्या अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सकडून मुरुगुझा पहिला सेट ०-६ हरली होती.