ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा आता अवघ्या काही तासांवर आली आहे. विविध सराव स्पर्धाच्या निमित्ताने अव्वल खेळाडू वर्षांतल्या पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत. या स्पर्धेत अव्वल खेळाडूंसह त्यांच्या नामवंत प्रशिक्षकांमध्ये मुकाबला रंगणार आहे. रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे ही चौकडी पुरुषांमध्ये जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहे. नदालचा अपवाद वगळता अन्य तिघांनी माजी प्रख्यात खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे.
इव्हान लेंडल मरेचे प्रशिक्षक आहेत तर रॉजर फेडररने स्टीफन एडबर्ग यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या दोघांपाठोपाठ जोकोव्हिचच्या प्रशिक्षकांच्या चमूत बोरिस बेकर समाविष्ट झाल आहेत. या तिघांप्रमाणे नदालने प्रसिद्ध खेळाडूला प्रशिक्षकाची निवड केली नाही, तो या स्पर्धेतही आपले काका टोनी नदाल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे.
तगडय़ा नामवंत प्रशिक्षकांच्या साथीने खेळणाऱ्या त्रिकुटाला नमवण्याची किमया नदालला करावी लागणार आहे. दुसरीकडे आपल्या अव्वल मानांकित खेळाडूंना वर्षांतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजयपथावर नेण्याचे आव्हान या प्रशिक्षकांसमोर असेल. आपला अनुभव पणाला लावत ‘लेंडल-बेकर-एडबर्ग’ त्रिकुट आपल्या शिष्यांना विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झाले
आहेत.
मात्र या तिघांपुढचे आव्हान एवढे सोपे नाही. २०१३ वर्षांत रॉजर फेडररला एकाही ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा करता आला नाही. एटीपी दर्जाच्या स्पर्धेचे केवळ एक जेतेपद त्याच्या नावावर होते. अननुभवी, नवख्या खेळाडूंनी त्याचे आव्हान संपुष्टात आणले. वयाची तिशी गाठलेल्या फेडररला पुन्हा विजयपथावर आणण्याचे शिवधनुष्य त्याचे गुरू एडबर्ग यांच्यासमोर असणार आहे.
आपली झेप उपांत्यफेरीपुरती मर्यादित नसून, आपणही जेतेपद पटकावू शकतो हे अँडी मरेने सिद्ध केले. मात्र त्याला सातत्याची जोड मिळणे आवश्यक आहे. मरेकडून लेंडल यांना तशी कामगिरी करवून घ्यायची आहे.
चिवट खेळाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीला बाजूला सारत जेतेपद पटकावणाऱ्या जोकोव्हिचला यंदाच्या वर्षांत नव्याने स्वत:ला सिद्ध करावे लागेल. गेल्या वर्षांच्या दुसऱ्या सत्रात जोकोव्हिचच्या कामगिरीत घसरण झाली होती. त्याचा आत्मविश्वास उंचावण्याचे काम बेकर यांना करायचे आहे.
या सर्व समीकरणांमुळे ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत यंदा खेळाडूंइतकाच त्यांच्या प्रशिक्षकांमध्ये रंगणारा मुकाबला रोचक असणार आहे.