ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

गतविजेता आणि अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच याच्यासाठी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पेपर सोपा ठरला. सर्बियाच्या जोकोव्हिचने रशियाच्या अस्लान करात्झेव्ह याचा ६-३, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ३३ वर्षीय जोकोव्हिचने कारकीर्दीत २८व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत आठ वेळा अंतिम फेरीत पोहोचलेल्या जोकोव्हिचने जेतेपदावर नाव कोरले आहे. विशेष म्हणजे नऊ वेळा उपांत्य फेरीत त्याने अपराजित राहण्याची किमया साधली आहे.

ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पदार्पणातच उपांत्य फेरी गाठणाऱ्या करात्झेव्हचे अंतिम फेरीत मजल मारण्याचे स्वप्न अधुरे राहिले. जोकोव्हिचसारखा अव्वल प्रतिस्पर्धी समोर असताना त्याचा निभाव लागला नाही. दुसऱ्या सेटमध्ये १-५ अशा पिछाडीवर पडल्यानंतर करात्झेव्हने जोमाने पुनरागमन केले. पण जोकोव्हिचच्या झंझावातासमोर तो निष्प्रभ ठरला.

अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिचे कारकीर्दीतील विक्रमी २४वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न गुरुवारी जपानच्या नाओमी ओसाका हिने धुळीस मिळवले. अखेर सेरेनालाला ३-६, ४-६ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. ओसाकाने चौथ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून यापूर्वी तिने अमेरिकन (२०१९) आणि ऑस्ट्रेलियन (२०१९) ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले आहे. आता शनिवारी सकाळी रंगणाऱ्या महिलांच्या अंतिम फेरीत ओसाकासमोर जेनिफर ब्रॅडी हिचे आव्हान असेल.

अमेरिकेच्या २२व्या मानांकित जेनिफर ब्रॅडी हिने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हा हिचाअटीतटीच्या उपांत्य लढतीत ६-४, ३-६, ६-४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

चाहत्यांचे पुनरागमन

पाच दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा मेलबर्न पार्कवर चाहत्यांचे पुनरागमन झाले. आता बाद फेरीच्या अखेरच्या टप्प्यात चाहत्यांचे आगमन झाल्याने खेळाडूंचा उत्साह वाढला आहे. १३ फेब्रुवारीला सुरू झालेला टाळेबंदीचा कालावधी बुधवारी मध्यरात्री संपुष्टात आल्याने गुरुवारपासून चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.

पात्रता फेरीतून करात्झेव्ह याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. टेनिसच्या इतिहासात असे चित्र दुर्मीळ असते. या स्पर्धेतील हा माझा सर्वात चांगला विजय ठरला. पोटाच्या विकारानंतर संपूर्ण स्पर्धेत आता मला चांगली कामगिरी करता आली. त्यामुळे आता एक दिवस सराव करून अंतिम फेरीसाठी सज्ज होण्याचा माझा प्रयत्न असेल.

– नोव्हाक जोकोव्हिच