पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने अनोखी कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या मोहम्मद अब्बासचा बळी घेत, कमिन्सने २०१९ सालात कसोटी क्रिकेटमधला आपला ५० वा बळी घेतला. अशी कामगिरी करणारा कमिन्स या वर्षातला पहिला गोलंदाज ठरला आहे.

२०१९ वर्षात कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज पुढीलप्रमाणे –

  • पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – ५१*
  • स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – ३८
  • मोहम्मद शमी – ३३

अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने आक्रमक खेळ केला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळाच्या जोरावर यजमान संघाने पहिल्या डावात ५८९ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाचा पहिला डाव ३०२ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मिचेल स्टार्कने ६ तर पॅट कमिन्सने ३ बळी घेतले होते.

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला फॉलो-ऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही पाहुण्या संघाची अवस्था खराब झाली. आघाडीच्या फळीत सलामीवीर शान मसूदच्या अर्धशतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही भेदक मारा करत पाकिस्तानी फलंदाजांच्या नाकीनऊ आणले.