भारताचा कर्णधार विराट कोहलीवर ऑस्ट्रेलियातील माध्यमांकडून टीका होत असताना ऑस्ट्रेलायचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क मात्र विराटच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहून सर्व टीका फेटाळून लावत आहे. विराट कोहलीकडे आता जगातील सर्वात नावडता खेळाडू म्हणून पाहिले जात असल्याचा प्रश्न मायकेल क्लार्कला विचारण्यात आला असता त्याने हे विधान पूर्णपणे फेटाळून लावले. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत मायकेल क्लार्क याने कोहलीवरून सुरू असलेल्या सध्याच्या वादात कोहलीची बाजू भक्कमपणे मांडली. कोण म्हणतंय कोहली जगातील सर्वात नावडता खेळाडू? छे..असं अजिबात मला वाटत नाही, असे क्लार्क म्हणाला.

 

रांची कसोटीत विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात उडालेल्या खटक्यांनंतर ऑस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने कोहली क्रीडा जगतातील डोनाल्ड ट्रम्प असल्याचे विधान केले होते. या वृत्तानंतर हे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे. कोहलीवर करण्यात आलेल्या या टीकेवरून भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन माध्यमांवर जोरदार टीका केली. तर अनेक मान्यवर मंडळींनीही कोहलीच्या पाठिशी खंभीरपणे उभे राहून ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केलेली टीका दुर्देवी असल्याचे मत व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि चाहत्यांचा कोहली हा सर्वात नावडता खेळाडू आहे, असं वाटतं का? या प्रश्नावर उत्तर देताना क्लार्क म्हणाला की, असं अजिबात नाही. हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. ऑस्ट्रेलियात विराटचे खूप चाहते आहेत आणि त्यांना विराट त्यांना खूप आवडतो. कोहलीला मी चांगला ओळखतो, आम्ही एक ऑस्ट्रेलियन म्हणून जे केले असतं त्यापेक्षा विराट काही चुकीचं करत आहे असं मला अजिबात वाटत नाही. आम्ही ज्या आक्रमकतेने क्रिकेट खेळत आलो आहे. त्याच आक्रमकतेने विराट खेळताना दिसतो. त्यात काहीच चुकीचे नाही.
विराटची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करण्यात आली तेव्हा तर मला माध्यमांवर हसू आले. विराटसारखा उच्च प्रतिच्या कौशल्याचा खेळाडू या जगात नाही. कोहलीला केवळ बदनाम करण्यासाठी काही पत्रकार असे लक्षवेधी बातम्या देत असतात. त्याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे, असेही क्लार्क म्हणाला.