करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका जगभरातील क्रीडा क्षेत्राला बसला आहे. दोन महिन्यांपासून जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद असल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने पावलं उचलली आहेत. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल नेमका काय निर्णय घ्यायचा हे आयसीसीने अजून स्पष्ट केलेलं नाही. ३० सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात लॉकडाउन असल्यामुळे अत्यंत कमी कालावधीत स्पर्धेचं आयोजन कसं करायचं याबद्दल अनेक सदस्यांच्या मनात शंका होती. त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन पुढे ढकललं जाईल अशी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होती. परंतू आयसीसीने या स्पर्धेच्या आयोजनाबद्दलचा निर्णय जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलत अधिक पर्याय शोधण्याचं ठरवलंय.

अवश्य वाचा – आयपीएल हे फक्त मनोरंजनासाठी नाही, हा एक व्यवसाय आहे – BCCI खजिनदार अरुण धुमाळ

टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर काळात आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. हा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे, बीसीसीआयने हा हंगाम खेळवण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र याचवेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियातील काही निर्बंध शिथील करण्यात येत असल्याची घोषणा करत क्रीडा स्पर्धांना मान्यता दिली आहे. याचसोबत सामना पाहण्यासाठी मैदानाच्या एकूण क्षमतेपेक्षा २५ टक्के लोकांना प्रवेश दिला जाईल असंही मॉरिसन यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकाबद्दल ऑस्ट्रेलियन सरकारने अद्याप आशा सोडलेल्या नसल्याचं चित्र पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय कॅबिनेट बैठकीत मॉरिसन यांनी क्रीडा, महोत्सव आणि कॉन्सर्ट यासाठी नवीन नियम जाहीर केले. ज्यामुळे बीसीसीआयसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्वचषक झाल्यास बीसीसीआयला आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द करावा लागू शकतो. आयसीसीने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार टी-२० विश्वचषकाआधी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याआधी बीसीसीआयने आपला श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौरा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द केला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल नेमका काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.