नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना अनिर्णीत राहिला किंवा बरोबरीत सुटला किंवा पावसामुळे खेळाचे नुकसान झाले, तर कोणते निकष लावले जातील, या प्रश्नांच्या उत्तरांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) प्रतीक्षा आहे.

साऊदम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत होणाऱ्या अंतिम सामन्याची नियमावली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर करावी, अशी मागणी ‘बीसीसीआय’ने केली होती. येत्या काही दिवसांत ‘आयसीसी’कडून ही नियमावली स्पष्ट होऊ शकेल.

‘‘हा द्विराष्ट्रीय कसोटी सामना नाही. त्यामुळे नियमावली स्पष्ट होण्याची नितांत आवश्यकता आहे. सामना अनिर्णीत राहिला, बरोबरीत सुटला किंवा दोन्ही संघांचा किमान एकही डाव पूर्ण न होता पावसामुळे अधुरा राहिल्यास कोणते निकष लावण्यात येतील, हे स्पष्ट करण्याचे आवाहन ‘बीसीसीआय’ने केले आहे.