विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीतील अखेरच्या क्षणांमध्ये इंग्लंडला ओव्हरथ्रोवर सहा धावा मिळाल्या आणि न्यूझीलंडच्या हातातील सामना निसटला. पण त्या ओव्हरथ्रोवर नियमानुसार सहा नव्हे, तर पाचच धावा द्यायला हव्या होत्या, असे विख्यात माजी पंच सायमन टॉफेल यांनी सप्रमाण दाखवून दिल्याने खळबळ उडाली आहे.

ऑस्ट्रेलियाचे सायमन टॉफेल हे क्रिकेट पंचविश्वातील  एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व. आयसीसी सवरेत्कृष्ट पंचांसाठीचा पुरस्कार त्यांनी सलग पाच वर्षे जिंकला होता. त्यांनी अंतिम सामन्यासाठी मैदानावर पंचगिरी करणाऱ्या दोन पंचांच्या – श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि दक्षिण आफ्रिकेचे माराइस इरॅस्मस – त्या निर्णयातील त्रुटी दाखवून दिली. ५०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्टिन गप्तिलच्या ‘ओव्हर-थ्रो’वर इंग्लंडला सहा धावा मिळाल्या. तीन चेंडूंवर नऊ धावा हे समीकरण त्यामुळे दोन चेंडूंवर तीन धावा असे आटोक्यात आले.

इंग्लंडला पाच धावा मिळाल्या असत्या, तर हे समीकरण दोन चेंडूंवर चार धावा असे बदलले असतेच, शिवाय बेन स्टोक्सऐवजी आदिल रशीदला चेंडूचा सामना करावा लागला असता.

फलंदाजांनी पहिली धाव पूर्ण केली आहे की नाही तसेच क्षेत्ररक्षकाने चेंडू हातात घेऊन तो फेकला आहे की नाही, या दोन्हींवर लक्ष ठेवणे पंचांसाठी कठीण असते. चेंडू फेकताना दोन्ही फलंदाज नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत, हेसुद्धा पाहण्याची गरज आहे. पंचांच्या या चुकीच्या निर्णयामुळे सामन्याचा निकाल बदलला. अर्थात हे न्यूझीलंडसाठी अन्यायकारक असले, तरी अशा चुका पंचांकडून इतक्या महत्त्वाच्या सामन्यात होऊ शकतात.

– सायमन टॉफेल, माजी आयसीसी पंच.

नियम काय, घडले काय?

  • ओव्हरथ्रोशी संबंधित आयसीसी नियमाच्या १९.८ या कलमानुसार, क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकण्यापूर्वी दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले असेल, तरच ती धाव ग्राह्य़ धरली जाते.
  • त्यानंतर चौकाराच्या धावा मोजल्या जातात. पण  गप्तिलने चेंडू फेकण्यापूर्वी बेन स्टोक्स आणि आदिल रशीद यांनी दुसऱ्या धावेसाठी परस्परांना ओलांडले नव्हते. त्यामुळे एक ग्राह्य़ धाव अधिक ओव्हरथ्रोनंतरच्या चार अशा पाच धावा मोजायला हव्या होत्या.