अयोध्येतील भव्यदिव्य अशा राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज (५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी केवळ अयोध्याच नव्हे तर संपूर्ण देश सजला आहे. पंतप्रधान मोदींची उपस्थिती असणाऱ्या या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसेच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. याद्वारेच निमंत्रित व्यक्तीला भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटर आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने भारतीयांना एक संदेश दिला आहे.

“नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांची दडपशाही न करणे या दोन गोष्टींमुळेच देशात ऐक्य आणि एकात्मता टिकून राहते. प्रभू रामचंद्र यांचे विचार हे प्राचीन काळापासून भारतीयांना मार्गदर्शन करत आहेत. प्रभू रामचंद्र यांचे प्रतीक असणारे न्याय, चांगुलपणा आणि समृद्धी यासारखी मूल्य आपल्यात रूजवण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी परिश्रम घेतले पाहिजेत”, असा संदेश गौतम गंभीर याने ट्विट करत दिला.

दरम्यान, भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बडे नेते अयोध्येत येणार आहेत. त्यामुळे अशा वेळी सावधानतेचा उपाय म्हणून भूमिपूजन सोहळ्यासाठी सेवा देणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, राम जन्मभूमी मंदिराच्या परिसरातील पुजारी या साऱ्यांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. यात मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांचीही कोविड चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मुख्य पुजारींचे सहकारी पुजारी आचार्य प्रदीप दास हे काही दिवसांपूर्वी कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. याशिवाय भूमिपूजन सोहळा प्रस्तावित असलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या १६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पण मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांचा अहवाल निगेटिव्ह आला.