त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियममध्ये झालेल्या कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बार्बाडोस ट्रायडंट्स संघाने दमदार विजय मिळवला. गयाना अमेझॉन वॉरियर्स संघाला त्यांनी २७ धावांनी धूळ चारली आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूंची चर्चा रंगलीच, पण त्यापेक्षा जास्त चर्चेत राहिले ते ‘बाबाजी का ठुल्लू’ सेलिब्रेशन.. फलंदाजाला बाद केल्यावर एका गोलंदाजाने अनेख्या पद्धतीने केलेलं हे सेलिब्रेशन चांगलेच लक्षवेधी ठरले.

या सामन्यात वेस्ट इंडीजचा ऍश्ले नर्सने विकेट घेतल्यानंतर ‘बाबाजी का ठुल्लू’ दाखवत अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केला. त्याचा व्हिडिओ सध्या मोठ्याप्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विंडिजचा गोलंदाज अ‍ॅश्ले नर्स याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्सच्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर नर्सने ‘बाबाजी का ठुल्लू’सारखी अ‍ॅक्शन करत आनंद साजरा केला. भारताचा कॉमेडियन कपिल शर्मा याने एका शो मध्ये ‘बाबाजी का ठुल्लू’ अ‍ॅक्शन केली होती. त्याची ती अ‍ॅक्शन प्रचंड हिट झाली. तीच अ‍ॅक्शन नर्सनेही केली. त्यामुळे ही कृती पाहून चाहत्यांनाही आनंद झाला आणि विनोदी अभिनेता कपिल शर्माची आठवण झाली.

अ‍ॅश्लेने या सेलिब्रेशनमागचे कारणही सांगितले. “मी अशाप्रकारे आनंद व्यक्त करण्यामागे माझा भारतीय मित्र सनी सोहेल जबाबदार आहे. कॅरिबियन प्रिमियर लीगमध्येच आमची गाठ पडली. गडी बाद केल्यावर प्रत्येक खेळाडू काहीतरी अ‍ॅक्शन करतो. तू जेव्हा गडी बाद करशील, तेव्हा ‘बाबाजी का ठुल्लू’ दाखव. मलाही ती अ‍ॅक्शन आवडली. म्हणून तसं केलं”, असे त्याने याबाबत बोलताना सांगितले.