आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या बजरंग पुनिया याच्याकडे शनिवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक अिजक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारताच्या ३० जणांच्या पथकाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

२०१३च्या जागतिक अिजक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या बजरंगला आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला. आता ६५ किलो वजनी गटात त्याच्यावर भारताची भिस्त असेल. गेल्या महिन्यात त्याला प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी डावलण्यात आले होते. पण ते सर्व विसरून कठोर मेहनत घेऊन तो आता पदक मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत त्याने ज्या सहजतेने सुवर्णपदक पटकावले, त्यामुळे या स्पर्धेतही तो पदकासाठी दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेत मानांकन मिळवलेला एकमेव खेळाडू असलेला बजरंग रविवारी रिंगणात उतरेल.

‘‘गेल्या काही आठवडय़ांपासून आम्ही या स्पर्धेसाठी कसून सराव करत आहोत. प्रतिस्पर्धी कुस्तीपटूंचा विचार करता, भारतीय खेळाडूंना पदक मिळविण्याच्या संधी आहेत. मॅटवर आमचे मल्ल कमी पडणार नाहीत, असा विश्वास आहे,’’ असे बजरंगने सांगितले.

महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनेश फोगट हिच्याकडूनही भारताला पदकाच्या अपेक्षा होत्या, पण तिने कोपराच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. तिची बहीण रितू फोगट आता भारताचे प्रतिनिधित्व करेल. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक सध्या चांगल्या कामगिरीसाठी धडपडत असल्यामुळे तिच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगली जात नाही.

शनिवारी फ्रीस्टाइल प्रकाराच्या कुस्तींना सुरुवात होणार असून सोनबा तानाजी गोंगाणे (६१ किलो), पवन कुमार (८६ किलो) आणि सुमित (१२५ किलो) हे रिंगणात उतरतील.